प्रेमासाठी मुलीने तिच्या वडिलांच्या साडेबारा लाखावर मारला डल्ला

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


प्रेमासाठी मुलीने तिच्या वडिलांच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. साडेबारा लाख रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी चारकोप पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
व्यावसायिक हे पत्नी आणि तीन मुलांसोबत कांदिवली येथे राहतात. त्यांची मोठी मुलगी ही कांदिवली येथे एका महाविद्यालयात शिक्षण घेते. महाविद्यालयात असताना तिची एकाशी ओळख झाली होती. तेव्हापासून ती त्याच्या संपर्कात आहे. लॉकडाऊन काळात मुलगी ही मोबाईलवर त्या तरुणासोबत चॅटिंग करत असायची. तसेच ती एकाशी फोनवरदेखील बोलत असायची. तेव्हा मुलीच्या आईने तिची समजूत काढली होती. त्याचदरम्यान घरातून पावणेचार लाख रुपये गहाळ झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला विचारणा केली.

मुलीच्या वडिलांनी तिच्या मोबाईलमधील ई-वॉलेटची तपासणी केली. तेव्हा तिच्या ई-वॉलेट अकाऊंटवरून काही व्यवहार झाल्याचे उघड झाले. मुलीच्या वडिलांनी चौकशी केली तेव्हा हा प्रकार उघड झाला. त्या मुलीचा प्रियकर आणि तीन मित्रांच्या खात्यात रक्कम गेली होती. हा प्रकार समोर येताच मुलगी रागाने निघून गेली होती. तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या मुलीला शोधून काढले होते. तेव्हा त्या मुलीने आपण स्वखुशीने गेल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगितले. आपण लवकरच लग्न करणार असून त्यासाठी एक जण मदत करणार असल्याचे मुलीने तिच्या वडिलांना सांगितले. जर प्रियकराविरोधात तक्रार केल्यास घरी येणार नाही, असे सांगितले. तेव्हा मुलीच्या वडिलांनी पैशाची मागणी केली. त्यानंतर त्या पाच जणांनी पैसे देण्यास नकार दिला. अपहार केल्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.