धक्कादायक ! मिरची पावडरचे पाणी करून विवाहितेच्या डोळ्यात, कानात ओतले
उच्चभ्रू समजल्या जाणार्या पुण्यातील कोथरूड परिसरात विवाहितेचा हुंड्यासाठी अमानुष छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरची पावडर पाण्यात मिसळून ते तिखट पाणी तिच्या तोंडात, डोळयात, कानात ओतल्याचा वास्तव गुन्हा दाखल झाल्यानंतर उजेडात आले आहे.
याप्रकरणी सासरच्यांवर कोथरूड पोलिस ठाण्यात हुंडाबळी, गंभीर मारहाण, धमकावणे अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती नागेश कार्तीक साहेबन्ने (23), रत्ना कार्तीक साहेबन्ने (42), महादेवी जाधव (58, सर्व रा. कोथरूड) आणि लिंबराज भिसे (58, रा. केळेवाडी, कोथरूड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरूणीने याबाबत पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
पिडीत महिलेबरोबर नागेशचा ऑक्टोबर 2021 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्यांककडून तिला माहेरहून हुंड्याचे पैसे आणण्यासाठी तगादा लावला जावू लागला. नंतर यातूनच तिला त्रास देण्यास, शिवीगाळ करण्यास सुरूवात झाली. त्यातून तिचा मानसिक व शाररिक छळ होऊ लागला. सासरचे येवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराची सीमा पार करत तिचे हातपाय बांधून पाण्यामध्ये मिरची पावडर मिसळून ते पाणी तिच्या तोंडा, कानात, डोळ्यात ओतले. तिच्या अंगावर तोंडावर मिठाचे पाणी टाकले, चुलीतील पेटलेल्या लाकडाने तिच्या हातावर, पायावर, डोळ्याजवळ, ओठावर चटके दिले. दरम्यान अत्याचार सहन न झाल्याने तिने सरते शेवटी पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणात फिर्यादी महिलेनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सासूकडून मारहाण सुरू असल्याबाबत फोन केला होता. त्यानुसार मार्शलने तात्काळ घटनास्थळी जात महिलेला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील कायदेशिर प्रक्रीया सुरू आहे.
– दिगंबर कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे.