तिसऱ्या माळ्यावरून पडून नवविवाहितेचा मृत्यू

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नागपूर: घराच्या तिसऱ्या माळ्यावरून काेसळून नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना सावनेर शहरात शनिवारी घडली.

ती नेमकी कशी काेसळली, याबाबत कुणालाही माहिती नाही, शिवाय या घटनेबाबत परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मृत सुषमाच्या हात व पाेटावर ओरबाडल्याच्या खुणा असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली असून, तिच्या खाेलीत, तसेच धारदार काचेवर रक्ताचे डाग असल्याचे सांगितले. याला पाेलिसांनी खासगीत दुजाेरा दिला आहे. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तिच्या मृत्यूच्या कारणासाेबत अन्य महत्त्वाच्या बाबी उघड हाेणार असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.

सुषमा नरेश इंगळे असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. ती मूळची वाठाेडा, नागपूर येथील रहिवासी असून, पती नरेश सावनेर शहरात नाेकरी करीत असल्याने, ती पतीसाेबत शहरातील जटाशंकर ले-आउटमध्ये किरायाने राहायची. त्या दाेघांचेही १५ दिवसांपूर्वीच लग्न झाले हाेते. ती इमारतीवरून काेसळल्याची माहिती मिळताच, हितेश बन्साेड यांनी घटनास्थळ गाठत पाेलिसांना सूचना दिली.

हितेश यांनी लगेच जखमी अवस्थेत तिला सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तिला तपासणीअंत मृत घाेषित केले. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरात पाठविण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी सावनेर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.