फिनिक्स मॉलमधील शोरुमचालकाला मारण्याची धमकी देत उकळली खंडणी
फिनिक्स मॉलमधील फर्स्ट क्राय कंपनीच्या शोरूमचालकाला माथाडीच्या नावाखाली जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
तसेच त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुणे : विमाननगर येथील फिनिक्स मॉलमधील (Phoenix Mall) फर्स्ट क्राय कंपनीच्या (First Cry Company) शोरूमचालकाला माथाडीच्या नावाखाली जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने दोघांवर गुन्हा दाखल करुन एका सराईत गुन्हेगाराला अटक (Pune Crime) केली.
रविंद्र उर्फ रवि जयप्रकाश ससाणे (रा. चंदनननगर), मंगल सातपुते (रा. लोहगाव) यांच्यावर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर रविंद्र ससाणे याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. याबाबत जितेंद्र राहुल राम (रा. पुनावळे, चिंचवड) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अमोल पिलाने व त्यांच्या पथकाने केली आहे.
ससाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार
ससाणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तक्रारदार यांचे फिनिक्स मॉल येथील फर्स्ट क्राय कंपनीचे शोरुम आहे. शोरूमचे इंटर रिनोव्हेशनचे काम सुरु होते. या कामासाठी लागणाऱ्या प्लायवूडचा ट्रक फिनिक्स मॉल येथे आला होता. आरोपींनी ट्रकमधील प्लायवूड तक्रारदारांच्या कामगारांना खाली करुन न देता अडवणूक केली. तसेच आम्ही येथील स्थानिक असल्याचे सांगत काही एक काम न करता ८ लाख रुपयांची खंडणी मागणी केली. तडजोडीअंती साडेचार लाख रुपयांची मागणी आरोपींनी केली.
तसेच चेकद्वारे दोन लाख आणि उर्वरीत अडीच लाख रुपयांसाठी भेटून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत त्यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी खंडणी विरोधी पथक दोनकडून सुरू होती. चौकशीत माथाडीच्या नावाखाली खंडणी मागितल्याचे समोर आले. पथकाने गुन्हा दाखल करत एकाला अटक केली. तर, एकजण फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.