क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

मुंबई महापालिकेतील घोटाळ्यावर टीका करत मनसेचे थेट ED ला पत्र!


मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटासोबतच महाविकास आघाडीतील तिनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यात मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमनेही आपल्या अस्तित्वाचा लढा देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, मनसेकडून सातत्याने शिवसेनेच्या काळातील पालिकेच्या कारभारावर टीका करत थेट ईडीलाच पत्र पाठवले असल्याचे धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एवढेच नाही तर यावेळी आपल्या हाती भक्कम पुरावा लागल्याचे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे.



मनसेकडून आर्थिक गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “करोना काळात पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला गेला. करोना काळात चौकशीची मागणी होत होती. पण कंत्राटाची चौकशी करता येणार नसल्याचे पालिकेने सांगितले होते. मनसेनं सुरुवातीपासून यासंदर्भात आवाज उठवला आहे. पण यावेळी घोटाळ्याचा भक्कम पुरावा आमच्या हाती लागला आहे”, असे मनसेने पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

“करोना काळात कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला वेगवेगळी कंत्राटे देण्यात आली. त्यात मालाड व रिचर्डसन कुडास येथे करोना सेंटर्स उभारले होते. या सेंटरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जेवण, लाँड्री, सेनिटायझर पुरवठा अशी कंत्राटं युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांनी तयार केलेल्या ठक्कर अड पवार कंपनी, शिवसेनी एंटरप्रायजेस, शिवचिदंबरम फार्मा, रमेश अँड असोसिएट, अर्का कंपनी, देवराया एंटरप्रायजेस, जय भवानी एंटरप्रायजेस व ग्रीन स्पेस रिएल्टी या कंपन्यांना देण्यात आले. या कंत्राटांमागे कुणाचा सहभाग होता, याची चौकशी होणं गरजेचं आहे”, असे पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

“या कंपन्यांनी मागणीच्या अवघा ३० ते ४० टक्के पुरवठा करूनही बिलं मात्र १०० टक्के पुरवठ्याची सादर केली. त्यामुळे जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा घोटाळा सहाय्यक आयुक्त व लेखा अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचं दिसतंय”, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.

दरम्यान, यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “व्हॉट्सअॅप चॅट खरे आहेत की खोटे हा प्रश्न उद्भवू शकतो. पण ज्या खात्यांवर ज्या दिवशी पैसे जमा झालेत, त्याच्या पावत्याही आम्ही दिल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी संबधित यंत्रणांकडूनच व्हायला हवी. ती पक्ष म्हणून आम्ही करू शकत नाही. यासाठी आम्ही हे पत्र लिहिलंय”, असे संदीप देशपांडे म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button