विवाहित प्रेयसीची ३५ वार करून हत्या

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


डोंबिवली : कल्याणच्या ग्रामीण भागातील गोवलीच्या जंगलात आढळलेल्या महिलेच्या खूनाचा उलगडा करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. लग्नासाठी तगादा लावणाऱ्या विवाहित प्रेयसीची धारदार हत्याराने सर्वांगावर ३५ वार करून अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या प्रियकरासह त्याच्या साथीदाराला ४८ तासांच्या आता गुन्हा उघडकीस आणून कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जयराम उत्तरेश्वर चौरे असे अटक प्रियकराचे नाव आहे. तर सूरज गोलू धाटे असे हत्येत सहभागी असलेल्या त्याच्या साथीदाराचे नाव असून हे दोघे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर रुपांजली संभाजी जाधव असे मृत प्रेयसीचे नाव आहे. (Crime News)

जंगलात सोने सापडले असून तुही माझ्यासोबत चल

रुपांजली ही पुण्यात आपल्या पती व तीन मुलांसह राहत होती. आरोपी जयराम चौरे हा देखिल पुण्यात राहत असल्याने दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी जयराम आणि मृत महिलेचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून प्रेयसीने आरोपी जयरामकडे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने त्याचा मित्र सूरज याच्याशी संगनमत करून प्रेयसीच्या हत्येचा पुण्यातच कट रचला होता. प्रियकराने कट रचल्याप्रमाणे मृतक प्रेयसीला मला जंगलात सोने सापडले असून तुही माझ्यासोबत चल, अशी गळ घातली. या बहाण्याने पुण्याकडून नंतर तिला कल्याणच्या ग्रामीण भागातील जंगलात आणले. त्यानंतर तिच्यावर धारदार हत्याराने ३५ वार करून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर कल्याण तालुक्यातील गोवली जंगलात तिचा मृतदेह सोडून या दोन्ही आरोपींनी पळ काढला. २७ डिसेंबर रोजी गोवेलीच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. या महिलेच्या मृतदेहाजवळ एक आध- रकार्ड आढळून आले होते.

Crime News : सोशल मीडियाचा झाला फायदा दुसरीकडे

घटनास्थळी सापडलेल्या आधारकार्डवरून महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. इंस्टाग्रामद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. त्यातून मृत महिलेचे मित्र व नातेवाईकांची माहिती समोर आली. यातील आरोपी जयराम चौरे याच्यासोबत मृत महिलेचे प्रेमसंबंध असल्याचे समोर येताच तांत्रिक पुराव्यांचा कौशल्यपूर्ण तपास सुरु केला. विशेष म्हणजे खुन्यांचा शोध घेण्यासाठी पुण्यातील चाकण व बीड या ठिकाणी जाऊन घटना उघडकीस आल्यापासून अवघ्या ४८ तासांच्या आत पोलिसांच्या या खास पथकाने खूनी जयराम चौरे आणि त्याचा साथीदार सूरज घाटे या दोघांना अटक केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर अधिक तपास करत आहेत.