ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेसंपादकीय

जिथे सिगरेट ओढण्यावर कायमस्वरूपी बंदी आणणारा कायदा लागू


न्यूझिलँड हा जगातील पहिला देश बनला आहे जिथे सिगरेट ओढण्यावर कायमस्वरूपी बंदी आणणारा कायदा लागू करण्यात आला आहे. यात वयाच्या चौदा वर्षांच्या आत असलेल्या मुलामुलींवर सिगरेट ओढण्याची बंदी आहे, त्यांना सिगरेट विकता येणार नाही, ओढता येणार नाही. ही बंदी दरवर्षी वाढत जाईल आणि ते मरेपर्यंत ही कायम राहणार आहे. येत्या काही वर्षांत न्यूझिलँडला सिगरेटमुक्त करण्याचं ध्येय तिथल्या सरकारनं ठेवलं आहे.

सिगरेट बनवण्यावर बंदी आहे की नाही हे मात्र समजलेंल नाही. आपल्या इथेही लहान मुलांनी सिगरेट ओढण्यावर बंदी आहे, त्यांना सिगरेट विकण्यावर बंदी आहे, सार्वजनिक स्थळी सिगरेट ओढण्यावर बंदी आहे पण त्याची अंमलबजावनी मात्र होत नाही.
मूळात सिगरेट उत्पादनावरच बंदी आणली जात नाही तोवर अशी बंदी कालांतराने निरुपयोगी ठरते.

बंदी आणलेल्या गोष्टी करून बघण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. शिवाय व्यसनांची तशीही आपल्याला इच्छा असतेच. तारुण्यात या गोष्टी अजून सहजतेने घडतात. सिगरेट ओढून आपण मोठे झालोत असा आभास मुलांना होतो. काहीतरी बंड केल्याचा आनंद होतो. तथाकथित शायनिंग मारता येते त्यांना. शिवाय समवयस्कांसोबत वावरताना इच्छा नसतानाही अशा गोष्टी केल्या जातात.

पण या सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या तरी सरकारी इच्छा असेल तर याहून जास्त चांगला उपाय करता येऊ शकतो जो केला जात नाही. जी गोष्ट वाईट आहे तिचं उत्पादनच मूळात का केलं जातं हा तो प्रश्न आहे. पण यावर अजून बंदी घातलेली नाहीये. सिगरेटमधून मिळणारी महसूल दारूच्या तुलनेत फारच कमी असतो. दारू उत्पादनावरही बंदी घातली जात नाही. मूळात हा प्रश्न मानवी इच्छेशीही आहे. एखाद्या स्वतंत्र देशात माणसांना काय करावं काय नाही करावं असं सांगावं का?

तर काही गोष्टी सांगणं गरजेचं असतंच. सिगरेटचं व्यसन हे घातकच आहे. त्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची जबाबदारी तुम्ही घेत असाल तर ठीक आहे. उद्या तुम्हाला काही झालं तर त्यासाठी सरकारला किंवा सिगरेट कंपन्यांना त्यासाठी जबाबदार धरू नका. असं मात्र होत नाही. मुलांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना तेवढी समज नसते. त्यामुळे त्यांना या गोष्टी समजावून सांगणं, प्रसंगी त्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती करणंही योग्यच असतं. हे सारे जुनेच मुद्दे आहेत. आपल्या देशातही आता सुट्या सिगरेट विक्रीवर बंदी घालण्याचा सरकार विचार करत आहे. त्याचं स्वागत आहे. काही समस्या या अशा लवकर सुटत नसतात. त्यांना वेळ लागतो. शेवटी हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः सिगरेट ओढत नसाल तर उत्तमच. ओढत असाल तर तिचं व्यसन लागू देऊ नका, इतरांना सिगरेट ओढण्यासाठी प्रवृत्त करू नका, तुम्हीही शक्यतो लवकरच सिगरेट बंद करा. सिगरेटला पर्याय आहे, जगण्याला पर्याय नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button