सरपंचाला ३० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


हिंगोली : पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारताना सरपंचाला हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथील एकास वारंगा फाटा शिवारामध्ये पोल्ट्री फार्म उभारायचे होते. यासाठी ग्रामपंचायतीच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे वारंगा फाटा येथील ग्रामपंचायतीशी संपर्क साधून त्यांनी नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, नाहरकत प्रमाणपत्रासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी सरपंच ओम कदम यांनी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून तक्रारीची शहानिशा करण्यात आली. यात लाच मागितल्याचे दिसून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक नीलेश सुरडकर, पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विजय पवार यांच्या पथकाने ४ ऑक्टोबर रोजी वारंगा फाटा येथे सापळा रचला.

यावेळी सरपंच ओम कदम ३० हजारांची लाच घेताना पथकाच्या जाळ्यात सापडले. याप्रकरणी पथकाकडून घराची तपासणी सुरू असून, सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. या पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद युनूस, जमादार विजय उपरे, तान्हाजी मुंडे, राजाराम फुफाटे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, योगीता अवचार आदींचा समावेश होता.

ग्रामसेवकाचाही सहभाग असल्याचा संशय
दरम्यान, पोल्ट्री फार्म टाकण्यासाठी लागणाऱ्या एनओसीसाठी सरपंचास पथकाने ताब्यात घेतल्यानंतर यात ग्रामसेवकाचाही सहभाग असल्याचा संशय पथकाला आहे. त्यानुसार सरपंच, ग्रामसेवकाच्या मोबाइल व्हॉइस रेकाॅर्डची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर ओम कदम हे उपसरपंच असून, मागील वर्ष-दीड वर्षापासून आदिवासी महिलेने राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त आहे. मध्यंतरी सदस्यांतून सरपंच निवडीचा प्रयत्न झाला. मात्र, तो निष्फळ ठरल्याने कदम हेच सरपंचपद सांभाळत आहेत.