गणेशोत्सवात घातपाताचा कट उधळला,अटक केलेले दहशतवादी जिहादी संघटनांच्या नियमित संपर्कात

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ऐन गणेशेत्सवात या दहशतवाद्यांकडून मोठे कट रचले जाण्याची शक्यता होती. त्यादरम्यान पश्चिम बंगाल पोलीस आणि एटीएस मुंबईने संयुक्त कारवाई करून दोघांना अटक करण्यात यश मिळवले.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. याच उत्सवी वातावरणादरम्यान दहशतवादी कट-कारस्थान रचले असल्याचा दाट संशय आहे.
पश्चिम बंगालच्या पोलिसांनी शनिवारी मुंबईतून दोन दहशतवाद्यांना अटक (Terrorist Arrest) केली असून ते दोघेही जिहादी दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते. पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष टास्क फोर्स (Special Task Force)च्या पथकाने एटीएस मुंबईच्या साहायाने ही अटकेची कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसही अधिक सतर्क (Alert) झाले आहेत. मुंबईत आलेल्या या दोन दहशतवाद्यांनी गणेशोत्सवाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे का? याचाही पोलीस तपास करीत आहेत.

पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) दिलेल्या माहितीनुसार, समीर हुसेन शेख आणि सद्दाम हुसैन खान अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघा दहशतवाद्यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक करण्यात आली.

समीर हुसेन शेख याला डायमंड हार्बर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तर सद्दाम हुसेन खान याला मुंबईतील निर्मलनगर येथून ताब्यात घेण्यात आले. नंतर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

पश्चिम बंगालच्या एसटीएफ आणि गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) हे दोघेही बऱ्याच गुन्ह्यांच्या तपासात हवे होते. त्यांनी वारंवार लपण्याचे ठिकाण बदलले आणि एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पोबारा केला होता. शेवटी गुप्तहेरांनी त्यांच्या मोबाइल फोनच्या टॉवर लोकेशन्सचा मागोवा घेतला. त्यावेळी ते मुंबईत लपून बसल्याचे समजले.

पोलिसांनी ताबडतोब महाराष्ट्र एटीएसशी संपर्क साधला आणि शनिवारी एसटीएफ आणि एटीएसच्या संयुक्त कारवाईतून दोघांना पकडण्यात आले. दोघांच्या ताब्यातून रोख रक्कम, लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले.