मुंबई : महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीने एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेना आमदारांवर सडकून टीका केली.
एवढच नाही तर प्रत्येक आमदाराला 50 खोके मिळाल्याचा आरोपही ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही 50 खोके एकदम ओके, अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांवरून शिंदेंकडे गेलेले शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी गंभीर आरोप केले आहेत. मातोश्रीवर किती खोके जातात, याची माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे.
‘गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी मतदारसंघात पाय ठेवून दाखवा, असं आव्हान त्यांनी केलं, पण सगळे आमदार आले. जनतेने त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी माझ्या वरळी मतदारसंघातून जाऊन दाखवा म्हणून सांगितलं, त्यांच्या नाकावर टिच्चून सगळे आमदार वरळी मतदारसंघातून गेले. मग सांगितलं विधानभवनात पाय ठेवून दाखवा.
सगळे आमदार विधानभवनात पोहोचले. ते बोलतात फक्त, दुसरं काय योगदान आहे. काही जमलं नाही आता खोके म्हणतात. मातोश्रीमध्ये किती मिठाईचे खोके गेले ते आम्हाला माहिती आहे.
आम्हाला तोंड उघडायला लावू नका’, असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला. ‘मातोश्रीमध्ये किती खोके गेले, किती मिठाई खाल्ली तरी त्यांना डायबिटीस होत नाही, सवय झालेली आहे. अंगवळणी पडलेलं आहे. त्यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवून खोक्यांची भाषा वापरावी, यासारखं आश्चर्य कोणतं नाही’, अशी टीकाही रामदास कदम यांनी केली.
‘बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे चालले आहेत, तर शरद पवारांचे विचार घेऊन उद्धव ठाकरे चालले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करण्याचं काम, त्यांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. मग त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आणि विचार सांगण्याचा अधिकार कुठून आला? त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा आणि शिवसेनेप्रमुखांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावेत, असं माझं वैयक्तिक मत आहे, हे मत मी एकनाथ शिंदेंसमोर मांडणार आहे’, असंही रामदास कदम यांनी सांगितलं.