शिक्षकाचे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत विकृत चाळे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पूर्व भागातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत विकृत चाळे केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बाबाजी उमाजी घोडे (रा. निमगाव सावा) असे या शिक्षकाचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी केंद्रप्रमुखांनी फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक बाबाजी उमाजी घोडे हा इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या गुप्तांगांना हात लावणे, खांद्यावर हात ठेवणे, मुलींना टेबलसमोर उभे करून बोलणे, मुलींना त्याच्या खुर्ची जवळ बोलावून त्यांना स्पर्श करत बोलणे अशाप्रकारे त्यांचा लैंगिक छळ करत होता. जून महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याबाबत मुलींनी आपल्या पालकांना सांगितले असता, पालकांनी 24 ऑगस्ट रोजी शाळेत जाऊन या संदर्भात तक्रार केली. शाळेने या तक्रारीची दखल घेऊन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्याशी संपर्क साधला. पठारे यांना काही पालकांनी फोन करून आपबिती सांगितली होती. त्यांनी या प्रकरणी एक समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते.

या समितीने मुलींशी संवाद साधत चौकशी केली. समितीने सातवीच्या वर्गातील अठरा मुलींची चौकशी केली. त्यातील तेरा मुलींसोबत हा प्रकार घडला असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. त्यामुळे या शिक्षकावरील आरोप सिद्ध झाला. सदर शिक्षकास गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्या आदेशाने निलंबित केले आहे. शिक्षक व विद्यार्थी या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या नराधम शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे करत आहेत.