अरेरे! अनेक शहरे अंधारात, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात ,कंपन्या बंद ,चीनमधील महागाईचे दर गगनाला भिडले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गेल्या सहा दशकांनंतरच्या सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना सध्या चीन करत आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली उष्णतेची लाट कायम राहिल्याने चीनमध्ये दि. १९ ऑगस्टला राष्ट्रीय दुष्काळ घोषित करण्यात आला.
त्यानंतर दि. २२ ऑगस्टला देशभरातील १६५ शहरांमध्ये ‘रेड अलर्ट’देखील घोषित करण्यात आला असून उष्णतेचे सर्व विक्रम मोडित निघाले आहेत. सप्टेंबरपर्यंत ही लाट कायम असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. चीन सध्या तीव्र उन्हाळ्याचादेखील सामना करत आहे.

२०१३ सालीदेखील चीनमध्ये उष्णतेची लाट आली होती, जी ६० दिवस कायम होती. यंदाच्या उष्णतेच्या लाटेने मात्र सगळे उच्चांक मोडीत निघाले आहेत. तीव्र उन्हाळा आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटामुळे चीनमधील वीजनिर्मितीदेखील ठप्प झाली आहे. जलविद्युत प्रकल्पांचे कामही थांबले आहे. अनेक शहरे अंधारात बुडाली असून ‘शॉपिंग मॉल्स’ केवळ पाच तास सुरू ठेवण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली आहे. शांघायसारख्या विकसित शहरालाही याचा मोठा फटका बसला आहे. ‘फॉक्सवॅगन’, ‘अ‍ॅपल’ आणि ‘टोयोटा’सारख्या कंपन्यांच्या प्लांटमधील काम ठप्प झाले आहे. ठिकठिकाणी तर कर्मचार्‍यांवर अंधारात काम करण्याची वेळ आली आहे.

चीनमधील यांगत्से आशियातील सर्वात मोठी नदी असून तीदेखील अनेक ठिकाणी कोरडीठाक पडली आहे. पाण्याअभावी चीनमधील शेती व्यवसाय संकटात आला असून पिके करपू लागली आहेत. जंगलामध्ये कडक उन्हामुळे वणवे भडकत असल्याने शेकडो एकर जंगल जळून खाक झाले आहे. चीनमधील सिचुआन, युनान, हुबेई, हुनान, अनहुई, जियांग्शी, जियांग्सु या प्रांतांमध्ये कोरडा दुष्काळ पडला असून यंदा ४० टक्के कमी पाऊस पडला आहे. शास्त्रज्ञांकडून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरीही त्यात अद्याप यश हाती लागलेले नाही.

२०२० साली चीनने यांगत्से नदीवरील ढगांना विशिष्ट पद्धतीने ढकलून ‘यलो रिव्हर’ याठिकाणी कृत्रिम पाऊस पाडला खरा. परंतु, त्यानंतर झपाट्याने निसर्गाचे चक्र बिघडत गेले आणि चीनच्या मागे दुष्काळाचे ढग दाटून आले. चोंगकिंग, सिंचुआन प्रांताचा सीमेजवळचा भाग, झेंजियांग प्रांताचा पूर्वेकडील भाग आणि शांनक्सी या ठिकाणी तर या महिन्याच्या सुरुवातीलाच पार्‍याने ४० अंश से. तापमानाचा टप्पा ओलांडला आहे. दुष्काळामुळे चीनचे ४०० दशलक्ष डॉलर्स करपून गेले आहेत. तब्बल साडेपाच कोटींहून अधिक लोकांना या दुष्काळाचा थेट फटका बसलेला आहे. यांगत्से नदीवर ‘थ्री गॉर्जेस डॅम’ हे धरण बांधण्यात आले असून त्यावरील जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उत्पादनही ४० टक्क्यांनी घटले आहे.

चीनच्या दक्षिणेकडील भागांमध्ये शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले असून तांदूळ आणि मक्याची पिके पाण्याअभावी करपून गेली असून हेनान भागातील तब्बल दहा लाख हेक्टरहून अधिक जमीन प्रभावित झाली आहे. आता चीनला मक्याच्या आयातीसाठी ब्राझील आणि अमेरिकेवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. साडेतीन हजार किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या पोयांग तलावात सध्या फक्त ७३७ चौरस किलोमीटर क्षेत्रात पाणी शिल्लक राहिले असून तलावाला मिळणार्‍या गन, झिन आणि शिऊ या प्रमुख नद्या आटल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तीव्र उन्हाळा आणि कोरडा दुष्काळ यांमुळे चीनमधील महागाईचे दर गगनाला भिडले असून अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी, बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे.

मुळात, चीनवर आलेले संकट नैसर्गिक भले असेल परंतु, त्याला चीन स्वतःही तितकाच जबाबदार आहे. निसर्गाला आव्हान देऊन चीनने नेहमीच विकासाच्या नावाखाली निसर्गाचा खेळ मांडला. त्याचबरोबरीने श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेशसारख्या देशांना कर्जाचे आमिष दाखवून तिथेही चीनने आपल्या कुरापती चालू ठेवल्या. विस्तारवादाच्या नावाखाली चीन शेजारील देशांनाही आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोरोनामुळे आधीच आर्थिक डबघाईला आलेल्या चीनने आपल्या दिवाळखोरीचे कधीही प्रदर्शन केले नाही वा त्याला प्रसिद्धी मिळणार नाही, याची खबरदारी घेतली. प्रसारमाध्यमेही चीनने आपल्या ताब्यात ठेवली आहे. ‘कराल तसे भराल’ या उक्तीप्रमाणे चीन सध्या दुष्काळाचा सामना करतोय. दुसर्‍यांना याचना करण्यास भाग पाडणारा चीन सध्या दुसर्‍या देशांकडे याचना करतोय