क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

दलित शिक्षिकेने हक्काचे पैसे मागितले म्हणून तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळले


राजस्थानमध्ये एक भयानक घटना घडली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. एक दलित शिक्षिकेने हक्काचे पैसे मागितले म्हणून तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना जयपूरमध्ये घडली आहे. आणखी वाईट प्रकार म्हणजे एक दोन नव्हे तर दहा जणांनी या शिक्षिकेला जिवंत जाळले. जयपूरच्या रायसर गावात ही घटना घडली. ही शिक्षिका ७० टक्के भाजल्याने तिला येथील एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सहा दिवस उपचार करण्यात आले. ही शिक्षिका मृत्यूशी झुंज देत होती. अखेर सातव्या दिवशी या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे जयपूर हादरून गेले आहे.



या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. अनिता रेगर असे या शिक्षिकेचं नाव आहे. १० ऑगस्ट रोजी अनिता सकाळी 8 वाजता तिचा मुलगा राजवीरसह बाजूलाच असलेल्या वीणा मेमोरियलला जात होती. याच शाळेत ती शिक्षिका होती. त्यावेळी रस्त्यात काही नागरिकांनी तिला घेरलं. आरोपींपासून बचाव करण्यासाठी अनिता बाजूच्या घरात घुसली. तिने मदतीसाठी १०० नंबरही फिरवला. पण पोलीस आली नाही. त्यानंतर आरोपींनी अनिताच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिलं. या घटनेची माहिती मिळताच अनिताचे पती ताराचंद आणि त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी धावले.

अनिताला रामगडच्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र, ७० टक्के भाजलेली असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जयपूरच्या बर्न वॉर्डमध्ये हलविण्यात आले. रुग्णालयातील अनिताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती झालेल्या घटनेची माहिती देताना दिसत आहे. यात तिने आरोपींची नावेही सांगितली आहेत. विशेष म्हणजे या आरोपींनी अनिताला जिवंत जाळले. त्यांना अनिताने अडीच लाख रुपये उसने दिले होते. ती बऱ्याच दिवसांपासून तिचे पैसे मागत होती. पैसे मागितले म्हणून यापूर्वी आरोपींनी अनिताला मारहाण केली होती. त्यामुळे या आरोपीं विरोधात अनिताने ७ मे रोजी रायसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.

या दुर्देवी घटनेनंतर अनिताला गावातील दहा लोकांनी जिवंत जाळल्याचा आरोप अनिताचे पती ताराचंद यांनी केला आहे. रामकरण, बाबूलाल, गोकुल, मूलचंद, सुरेशचंद, आनंदी, प्रहलाद रेगर (वॉर्ड पंच), सुलोचना, सरस्वती आणि विमला या आरोपींनी अनिताला जिवंत जाळल्याचा आरोप ताराचंद यांनी केला आहे. मात्र, अजूनपर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नाही. अनिताला जिवंत जाळल्या नंतर अनिताचे कुटुंबिय डीजीपींना भेटले होते. यावेळी आरोपींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र, पोलिसांकडून चालढकल करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button