ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

महाविकास आघाडीचे सरकार पडले हे बरे झाले. गेली अडीच वर्ष फक्त पैसे खाणे सुरू होते


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंडाळी केल्यानंतर पराकोटीला पोहोचलेल्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका करण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, यातच आता काँग्रेसच्या कार्यकारिणीतील एका नेत्याने महाविकास आघाडीचे सरकार पडले हे बरे झाले. गेली अडीच वर्ष फक्त पैसे खाणे सुरू होते, असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिल्याचे सांगितले जात आहे.

पक्षाचे सगळे मंत्री अडीच वर्षे फक्त पैसे खात होते. कोणताही कार्यकर्ता भेटायला गेला, तर तासनतास बाहेर बसवून ठेवायचे. त्यामुळे हे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला आहे, अशी खदखद एका पदाधिकाऱ्याने प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलून दाखवली आणि पक्षश्रेष्ठींच्या कारभाराचे वाभाडेच काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस आशीष दुआ, सोनल पटेल यांच्यासह ठाकरे सरकारमधील अनेक माजी मंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत हा सर्व प्रकार घडला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button