वास्को: दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मंगळवारी (ता.२३) दुपारी गोवा ते मुंबई जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या मागच्या बाजूस इंजिनाला आग लागल्याची घटना घडली. मात्र, ही गोष्ट समजताच प्रसांगवधान राखून विमानतळावरच विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.
विमानात चार मुलांसह 187 प्रवासी तर ‘इंडिगो’चे चार कर्मचारी होते. सायंकाळी 6 वा. दुसऱ्या विमानाने सर्व प्रवाशांना मुंबईला पाठवण्यात आले.
दाबोळी विमानतळावर मंगळवारी दुपारी 1:30 वा. इंडिगो प्रवासी विमानाने (6 ई 6097) प्रवासी गोवा ते मुंबई धावपट्टीवरून जाण्याच्या तयारीत असताना विमानाच्या मागच्या बाजूस इंजिनला आग लागल्याने तेथे उपस्थित असलेल्या नौदलाच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पुढील कारवाई करून विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूपरीत्या बाहेर काढले. नंतर विमानाच्या इंजिन रूमला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणले. विमानातील सर्व प्रवाशांना हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. इंडिगो विमानातील सर्व प्रवाशांना सायंकाळी 6 वा. दुसऱ्या विमानाने मुंबईला पाठवण्यात आले. दाबोळी विमानतळ आणि नागरी वाहतूक विमान प्राधिकरणाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.