दोन वर्षांनंतर तोच उत्साह, तीच तरुणाईची धूम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभीनाक्यावरील हा उत्सव मानाची हंडी समजली जाते. या दहीहंडी महोत्सवात मुंबई आणि ठाणेकरांसाठी वेगवेगळ्या हंड्या उभारल्या जात आहेत. ठाण्यातील वातावरण सध्या अष्टमी आणि कृष्णमय झाले आहे.

यंदाचा हा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शानाखाली पार पडणार आहे. दरम्यान, हंड्या फोडणाऱ्या मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी अडीच लाखांचे तर महिला गोविंदा पथकाला एक लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. दोन वर्षांनंतर तोच उत्साह, तीच तरुणाईची धूम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष पहायला मिळणार आहे.

ठाण्यातील दहीहंडी सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही दहीहंडी फक्त पारंपारिक पध्दतीने परंपरा खंडित न करता साजरी करण्यात आली होती. परंतु यावर्षी पुन्हा धर्मवीरांची ही मानाची हंडी त्याच उत्साहात, जल्लोषात साजरी होणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येणार आहेत.

मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२ हजार, सहा थरांसाठी आठ हजार, पाच थरांसाठी सहा हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी पाच हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख रमेश वैती, हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी उपस्थित होते.