१५ वर्षांच्या मुलीचा विवाह तिने गाठले थेट पोलिस ठाणे…

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पाटोदा : जेमतेम १५ वर्षांच्या जळगाव येथील मुलीचा बळजबरीने पाटोदा तालुक्यातील तरुणाशी विवाह लावून दिला
सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने जळगाव बसस्थानकातून अंबड (जि. जालना) गाठले. त्यानंतर पोलिसांना आपबीती सांगितली. अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तो १२ ऑगस्ट रोजी पाटोदा पोलिसांकडे वर्ग केला. आई, मामा, पती व सासरा हे यात आरोपी आहेत.

जळगाव येथील १५ वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी तिचा विवाह पाटोदा तालुक्यातील एका तरुणाशी ठरवला होता. मात्र, तिच्या आई व मामा यांनी ती अल्पवयीन असतानाही त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने पती पसंत नसल्याचे सांगून मला माहेरी घेऊन जा, अशी विनंती आई आणि मामाकडे केली. त्यामुळे त्यांनी तिला जळगावला परत आणले. २३ जुलै रोजी तिचा सासरा घेण्यासाठी आला. सासरी निघालेल्या मुलीने जळगाव बसस्थानकातून सासऱ्याची नजर चुकवली व दुसऱ्या बसने अंबडला पोहोचली. अंबड पोलिसांनी स्थानकात पोहोचून तिला धीर दिला. तिच्या तक्रारीवरून आई, मामा, पती आणि सासऱ्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे. हा गुन्हा पाटोदा पोलिसांकडे वर्ग झाला असून, पुढील तपास सुरू आहे