क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

ऑनलाइन कर्जाच्या विळख्यात, चीनकडून भारतीयांची लूट?


ऑनलाइन कर्जाच्या माध्यमातून होणारी फसवणूक आणि छळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. या तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
ऑनलाइन कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या भारतीयांचा पैसा चीन क्रिप्टो चलनाच्या माध्यमातून परदेशात पाठवत असल्याचे समोर आले आहे.

मुंबई पोलिसांनी ऑनलाइन कर्जप्रकरणी 18 लोकांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा झाला आहे. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे देशातील विविध भागातून काही जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस सायबर गुन्हे शाखेचे डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी दिली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 350 हून अधिक बँक खाती गोठवली आहेत. या खात्यांमध्ये 17 कोटीहून अधिक रक्कम आहे. आणखी काही खाती गोठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

डीसीपी राजपूत यांनी सांगितले की, आरोपींनी क्रिप्टो वॉलेट तयार केले आहेत. या द्वारे आरोपी सगळे पैसे क्रिप्टो चलनात रुपांतर करतात आणि त्या माध्यमातून सगळा पैसा परदेशात पाठवतात. आरोपींच्या क्रिप्टो वॉलेटची तपासणी केल्यानंतर 200 हून अधिक क्रिप्टो वॉलेट गोठवले असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रिप्टो चलनाचे मूल्य 9 कोटींहून अधिक असल्याची माहिती त्यांनी दिली.

300 अधिक अॅप बंद

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 300 हून अधिक ऑनलाइन कर्जाचे अॅप बंद केले आहेत. या लोन अॅपचा वापर करून आरोपी लोकांकडून वसूली करायचे. अद्यापही अनेक ऑनलाइन कर्ज देणारे अॅप असून त्यांच्यावर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे डीसीपी राजपूत यांनी सांगितले.



आरोपी कशी करायची लूट?

ऑनलाइन कर्जासाठीची जाहिरात सोशल मीडियावर आरोपींकडून केली जायची. ज्यांना गरज असायची असे गरजू त्यांना संपर्क करायचे. संपर्क केल्यानंतर आरोपींकडून गरजूंना एक लिंक पाठवली जायची. लिंकवर क्लिक करून अॅप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळेतच कर्ज दिले जायचे.

गरजू व्यक्तीने अॅप डाउनलोड केल्यानंतर फोन अॅक्सेस आरोपींकडे जायचा. त्यानंतर आरोपींना पीडित व्यक्तीच्या फेसबुकमधील मित्र यादी, त्याशिवाय मोबाइलमधील इतर अॅपचे अॅक्सेस आणि फोन गॅलरी व फोनमधील इतरांचे फोन क्रमांक मिळायचे. त्यानंतर आरोपी पीडितांना त्रास देण्यास सुरुवात करायचे. पैशांची मागणी करत त्यांना धमकी देत असायचे. यासाठी पीडित व्यक्तीचे फोटो मॉर्फ केले जायचे. हे मॉर्फ केलेले फोटो पीडित व्यक्तीचे मित्र आणि कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी आरोपी द्यायचे.

चीनकडून भारतीयांची लूट?

या प्रकरणाच्या चौकशीच्या दरम्यान मुंबई पोलिसांनी चीनच्या दोन नागरिकांविरोधात लूक आउट नोटीस जारी केली आहे. या प्रकरणातील आरोपींचे सूत्रधार चीनमध्ये असून तेथूनच सगळी सूत्रे हलवली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई पोलिसांनी Liu yi आणि Zhou ting ting या दोन चिनी नागरिकांविरोधात लूक आउट नोटीस जारी केली आहे. हे आरोपी 2018 च्या सुमारास भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी ऑनलाइन कर्ज देणारी कंपनी तयार केली. या कंपनीत त्यांनी भारतात राहणाऱ्या नागरिकांना कामावर ठेवले. भारतातून चीनमध्ये पुन्हा जाण्याआधी त्यांनी या कंपन्यांचे नियंत्रण आपल्याकडे ठेवले. चीनमधून प्रत्येक व्यवहारावर नजर ठेवली जात होती. तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी चीनमधील आरोपींनी बनावट कंपनी भारतीयांच्या नावावर नोंदणीकृत केली. या भारतीय व्यक्ती या कंपन्यांमध्ये प्रमुख पदांवर असायचे.

आरोपींना किती पैसे मिळायचे?

आरोपींना कर्जाच्या वसुलीसाठी ठरवलेल्या पगाराशिवाय इन्सेंटिव दिला जायचा. याच इन्सेंटिवसाठी आरोपीकडून कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या दिल्या जात असे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button