भारताला चीनकडून हेरगिरीचा धोका,चीनचे जहाज ‘युआन वँग ५’ची हंबन्टोटा बंदरातील संभाव्य भेट स्थगित

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उच्च तंत्रज्ञानयुक्त संशोधन कार्य करणारे चीनचे जहाज ‘युआन वँग ५’ची हंबन्टोटा बंदरातील संभाव्य भेट स्थगित करावी, अशी विनंती श्रीलंकेने चीनला केली आहे.
भारताच्या दबावामुळे श्रीलंकेने असे केल्याने चीन संतप्त झाला आहे. या प्रकरणी सुरक्षाविषयक चिंता व्यक्त करून भारताने श्रीलंकेवर विनाकारण आणलेला दबाव निरर्थक असल्याची टीका चीनने सोमवारी केली आहे.

रविवारी या प्रकरणी चीनच्या दूतावासाने श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी तातडीची बैठक घेऊन चर्चेची मागणी केली होती. हे जहाज श्रीलंकेच्या हंबन्टोटा बंदरात ११ ते १७ ऑगस्टदरम्यान येणार होते.

यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेन्बिन यांनी बीजिंग येथे प्रसारमाध्यमांना सांगितले, की चीनने यासंदर्भातील सर्व घडामोडींची दखल घेतली आहे. चीन आणि श्रीलंकेने स्वतंत्रपणे परस्परहिताच्या जपणुकीसाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तिसऱ्या देशाच्या हितसंबंधास हानी किंवा बाधा पोहोचतच नाही. त्यामुळे या जहाजासंबंधी सुरक्षेचे प्रश्न निर्माण करून, श्रीलंकेवर दबाव आणणे निरर्थकपणाची कृती आहे. श्रीलंका हे सार्वभौम राष्ट्र आहे. त्याच्या विकासासाठी आणि हितसंबंधांसाठी दुसऱ्या राष्ट्राशी संबध वाढवण्याचा, दृढ करण्याचा श्रीलंकेस अधिकार आहे. यासंदर्भात या जहाजाद्वारे चीनच्या संशोधनात्मक मोहिमेकडे त्याच पद्धतीने पाहण्यात यावे. त्याचा इतर कोणत्याही गोष्टींशी संबंध जोडून चीन आणि श्रीलंकेतील सामान्य संबंधांमध्ये अडथळे आणू नयेत. हिंदू महासागरातील श्रीलंका हे दळणवळणाचे मोक्याचे स्थान आहे. येथे संशोधनकार्य करणारी अनेक जहाजे इंधनासाठी थांबत असतात. चीनचे जहाजही त्यासाठीच येथे थांबणार होते. चीनतर्फे नेहमीच वैज्ञानिक शोधकार्यासाठी खोल समुद्रात विविध मोहिमा हाती घेतल्या जातात. असे करताना चीनने किनारपट्टीवरील देशांच्या सागरी हद्दीचा व अधिकारक्षेत्राचा नेहमीच पूर्ण आदर केला आहे, असा दावा त्यांनी केला.

भारताचा आक्षेप काय?

चीनच्या या जहाजाचे श्रीलंकेतील बंदरात थांबणे, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेस बाधा आणणारे असल्याचे भारताने श्रीलंकेस कळवल्याचे वृत्त आहे. या चिनी जहाजातील उच्च तंत्रज्ञानामुळे उपग्रह, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग काढणे (ट्रॅकिंग) सहज शक्य आहे. त्यामुळे भारताला चीनकडून हेरगिरीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने श्रीलंकेला या जहाजाच्या श्रीलंका भेटीच्या निषेधार्थ संदेश पाठवून, ही भेट रोखण्यासाठी दबाव आणला होता. हे जहाज श्रीलंकेच्या बंदरात जात-येत असताना त्यातील माग काढणारी (ट्रॅकिंग) यंत्रणा महत्त्वाच्या भारतीय संस्थांची हेरगिरी करण्याचा धोका आहे. त्याबद्दल भारताला चिंता वाटते. हिंदी महासागरात चिनी लष्करी जहाजांच्या वावराबाबत भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे आणि यापूर्वी श्रीलंकेसोबतच्या अशा भेटींना आक्षेप घेत विरोध केला आहे.