देश-विदेशमहत्वाचे

हिटलरच्या काळात प्रचारासाठी वापरलेली गोबेल्सनीती म्हणजे काय?


जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याचा 30 एप्रिल 1945 रोजी मृत्यू झाला. हिटलरनं केलेल्या ज्यूंच्या नरसंहारासोबत त्याच्या गोबेल्सनीतीची आजही चर्चा होते. ही गोबेल्सनीती काय होती, याचा घेतलेला हा आढावा…



“एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते. त्यामुळे आपल्या मुद्द्याचा सतत प्रचार करावा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो, तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी.”

हे अॅडॉल्फ हिटलरचं प्रचाराबाबतचं सूत्र होतं, जे प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स.

गोबेल्सची ओळख हिटलरचा एक विश्वासू सहकारी फक्त एवढीच नाही, तर तो एका प्रचारतंत्राचा जनक म्हणून गोबेल्सकडे पाहिलं जातं. असं म्हटलं जातं की याच ‘गोबेल्सनीती’मुळेच हिटलर सत्तेवर आला आणि सत्ता टिकवू शकला.

सामान्य प्रचारक ते प्रचारमंत्री
हिटलरची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्यात गोबेल्सने तयार केलेल्या प्रचार मंत्रालयाची भूमिका होती. तर हिटलरला विरोध करणाऱ्यांना नष्ट करण्यासाठी ‘शुट्सश्टाफल (Schutzstaffel किंवा SS) ही सेना अग्रेसर होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जनमानसात ज्यूंविरोधात मत तयार करण्याचं काम प्रचार मंत्रालयाने केलं. तर अंदाजे 60 लाख ज्यूंचा नरसंहार प्रत्यक्षपणे SSच्या अधिकाऱ्यांनी घडवून आणला.

त्यामुळे ज्यू लोकांच्या नरसंहाराला जितका हिटलर जबाबदार आहे, तितकंच जबाबदार SSचा प्रमुख हेनरिच हिमलर आणि प्रचार मंत्रालयाचा प्रमुख जोसेफ गोबेल्स यांनाही धरलं जातं.

नाझी पक्षाचा प्रचारक, संपादक, प्रचारमंत्री, युद्धमंत्री आणि शरणागती जाहीर करणारा जर्मनीचा एका दिवसाचा चॅन्सलर, अशा विविध भूमिका गोबेल्सनं बजावल्या. त्यामुळे गोबेल्सला 20व्या शतकातील सर्वांत भयंकर युद्ध गुन्हेगारांपैकी एक म्हटलं जातं.

1934च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सगळीकडे रंगबेरंगी पोस्टर्स लावले जायचे. सर्वच पक्ष आपले पोस्टर्स रंगीत बनवून त्यावर खूप साऱ्या घोषणा लिहीत. त्याच वेळी नाझी पक्षानं काळ्या पार्श्वभूमीवर हिटलरचा चेहरा आणि नाव असलेलं पोस्टर प्रसिद्ध केलं. त्यावर पक्षाचं नाव किंवा घोषणा देखील नव्हती, पण हे पोस्टर आपल्या स्पष्ट आणि ठळक दिसण्यामुळे लोकप्रिय ठरलं.

‘सामान्य माणूस हा विश्लेषक किंवा विचारवंत नसतो म्हणून त्याच्यापर्यंत मोजक्या शब्दात आपला संदेश पोहोचला पाहिजे,’ हा हिटलरचा विचार ध्यानात घेऊनच प्रचार विभागाने हे पोस्टर बनवलं होतं.

प्रोपगंडा आणि सेन्सरशिप ही दोन साधनं वापरून नाझी पक्षाने लोकांचं ब्रेनवॉश केलं. या प्रचाराच्या माध्यमातून हिटलरची एक आदर्श प्रतिमा निर्माण करण्यात आली होती.

1934 साली हिटलर सत्तेत आल्यानंतर जोसेफ गोबेल्सला Ministry of Enlightenment and Propagandaचा कारभार देण्यात आला. प्रचार हा अदृश्य आणि सर्वत्र असावा, असं त्याला वाटायचं. त्यामुळे माध्यमं, साहित्य, कला यांच्यावर कठोर निर्बंध लादली जायची. हलके फुलके मनोरंजनाचे कार्यक्रम किंवा नाझी विचारांचा प्रचार करणारं साहित्य, चित्रपटांना परवानगी दिली जाई.

आर्यन वंश हा सर्वांत शुद्ध आहे आणि ज्यू हे राष्ट्रद्रोही आहेत, या संदेशाचा मारा जर्मन लोकांवर केला जायचा. 1935पर्यंत देशातील 1600 वर्तमानपत्रं बंद करण्यात आली होती. ज्यू पत्रकारांवर बंदी घालण्यात आली होती. प्रत्येक बातमीला नाझी अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यावरच ती छापली जायची.

1939 पर्यंत जर्मनीत असलेल्या वर्तमानपत्रांपैकी 69 टक्के वर्तमानपत्रं ही नाझींच्याच मालकीची होती. त्याच सुमारास जर्मनीत रेडिओ लोकप्रिय होऊ लागला. प्रचारासाठी रेडिओचा वापर करता येईल हे गोबेल्सनं हेरलं.

अत्यंत अल्प दरात प्रत्येकाला रेडिओ उपलब्ध होईल, याची काळजी त्याने घेतली. त्या वेळी अंदाजे 90 लाख रेडिओ लोकांना स्वस्तात विकण्यात आले होते. 1939च्या शेवटाला जर्मनीतल्या 70 टक्के घरांमध्ये रेडिओ पोहोचला होता. रेडिओवर प्रसारित होणारे कार्यक्रम सेन्सर्ड असायचे.

हिटलरची किंवा गोबेल्सची भाषणं त्यावर लागत असत. फक्त घरातच नव्हे तर तुम्ही बाहेर जाल तिथे, रस्त्यावर, पार्कमध्ये, रेस्तराँ, बार सर्व ठिकाणी लाऊडस्पीकर लावून रेडिओ ऐकवला जात असे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button