महत्वाचे

बीड जिल्ह्यात सापडले तब्बल 25 ते 40 हजार वर्षांपूर्वीचे पुरावे, हे जीवाश्म कोणाचे?


मराठवाड्यातील लातूर जिल्हा एकेकाळी जल श्रीमंत आणि वनश्रीमंत असल्याचे तब्बल 25 ते 40 हजार वर्षांपूर्वीचे पुरावे हाती आले आहेत.

पुणे शहरातील डेक्कन कॉलेजच्या जीवाश्म विषयावर अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन करून मोठे यश मिळवले आहे. मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाणघोडा (हिप्पोपोटॅमस), हत्ती अन् वाघांची संख्या विपुल होती, असा निष्कर्ष तज्ञांनी काढला आहे.

दुष्काळग्रस्त म्हणून बीड अन् लातूर जिल्ह्याचे नाव नेहमीच घेतले जाते. हा भाग एकेकाळी जल आणि वनश्रीमंतीने विपुल होता. मांजरा खोर्‍यात हे सर्व पुरावे सापडले तेव्हा शास्त्रज्ञही थक्क झाले. लातूरपासून 20 तर रेणापूर तालुक्यापासून 13 कि.मी. जवळ असणार्‍या हारवाडी या छोट्याशा गावात पाणघोड्याचे जीवाश्म (हाडे) सापडले आहेत. हारवाडी हे गाव मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येते. 2016 मध्ये धरणात थेंबभरही पाणी नव्हते. तेव्हा पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या संशोधकांनी तेथे उत्खनन केले.

तेव्हा येथे अनेक प्राण्यांचे जीवाश्म (हाडे) सापडले. यात पाणघोड्याचा जबडाच सापडला असून तो तब्बल 23 हजार वर्षांपूर्वीचा असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. यावरून मराठवाडा एकेकाळी पाणी आणि वनसंपत्तीने सुजलाम् सुफलाम् होता, याचेच हे महत्त्वाचे पुरावे आहेत. या जीवाश्मांचा खजिना सध्या पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे.

डॉ. विजय साठे यांनी घेतला ध्यास

हे संशोधन डेक्कन कॉजेजमधील निवृत्त प्रा. डॉ. विजय साठे यांच्या अथक संशोधनाचे फलित आहे. ते 1980 पासून या विषयावर अभ्यास करीत असून त्याचे पुरावे मात्र 2016 मध्ये त्यांना मांजरा धरणाच्या खोर्‍यात हारवाडी गावात सापडले. यावर त्यांनी इंग्लंडच्या केंब्रीज विद्यापीठात शोधनिबंद प्रसिद्ध केला आहे. 36 डॉलर भरूनच तो वाचावा लागतो.

मांजरा नदीचे पाणलोट क्षेत्र होते समृद्ध

सध्या हे सर्व जीवाश्म डेक्कन कॉलेजमधील प्रा. डॉ. प्रतीक चक्रवर्ती यांच्या संशोधन प्रयोगशाळेत आहेत. त्यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, मांजरा धरणाजवळ लातूरपासून 20 कि.मी. अंतरावर असणार्‍या हारवाडी गावात पाणघोड्याचा जबडा सापडला तसेच बैलासह मगर, सुसर अशा अनेक प्राण्यांची हाडे सापडली. यात पाणघोड्याची हाडे अत्यंत दुर्मीळ आहेत. कारण पाणघोडा भारतातून खूप पूर्वी नामशेष झाला आहे. मराठवाड्यात अन् तेही लातूर जिल्ह्यात ही हाडे सापडल्याने मराठवाडा हा त्या काळात प्रचंड वन आणि जलसंपन्न होता याचा हा स्पष्ट पुरावा आहे.

कार्बन 14 डाटिंग तंत्रज्ञान वापरून काढले वय…

डॉ. प्रतीक हे तरुण शास्त्रज्ञ असून त्यांची प्रयोगशाळा मराठवाड्यातील या प्राण्यांच्या हाडांनी भरलेली आहे. एका भल्या मोठ्या टेबलावरील जीवाश्मांचे अवशेष पाहून मन हरखून गेले. नेमकी कोणती हाडे कोणत्या प्राण्यांची आहेत, याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कार्बन 14 डाटिंग तंत्रज्ञान वापरून या हाडांचे वय काढले आहे. महाराष्ट्रात 25 ते 40 हजार वर्षांपूर्वी पाणघोड्याची संख्या विपुल होती. लातूरजवळची ही हाडे त्याच काळातली आहेत.

हारवाडी धनेगाव, वांगदरी, गांजूर आणि ताडुळा या गावांत हे जीवाश्म सापडले आहेत. सुमारे 25 हजार ते 40 हजार वर्षांच्या काळातील हे जीवाश्म असल्याचा अंदाज आहे. यात पृष्ठवंशीय प्राण्यांच्या 20 पेक्षा जास्त तर 25 पेक्षा जास्त प्रजातींचा समावेश असण्याचा अंदाज आहे. यात लहान, मध्यम व मोठ्या आकाराचे सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, मायक्रोव्हर्टेब्रेटस् आणि मोलस्कचे हे पुरावे प्रारंभिक, मध्य आणि उच्च पाषाणकालीन युगाशी संबंध दाखवतात. यात मांजरा खोर्‍यातील बीड व लातूर या दोन जिल्ह्यांतील जीवाश्म हाडे आणि दातांवरचा हा अभ्यास आहे.

बीड आणि लातूर जिल्ह्यांच्या परिसरात सुमारे 45 जीवाश्म सापडले आहेत.
येथे प्रथमच शेल, कॅल्क्रेटची (ज्वालामुखी) राख सापडली.
मांजरा खोर्‍यात पाणघोडा (हिप्पोपोटॅमस) सापडला. त्यावरून तेथे त्या काळातील जल आणि वनसंपदेचा अंदाज येतो.
प्राण्यांसह सूक्ष्म जीवजंतूच्या दक्षिणेकडील स्थलांतरामुळे हा भाग मध्य ओलसर, कोरडा आणि शुष्क होत गेला.
इथे ओल्या जमिनीमुळे नदीकाठी बारमाही गवताचे आच्छादन होते. गवताळ प्रदेशांनी वेढलेले जंगल होते. स्थलांतरित मांसाहारी प्राण्यांची संख्याही मोठी होती. हारवाडी येथील जंगलात भरपूर वाघ होते.
भारतीय द्वीपकल्पाने पाणघोडे, हत्तींच्या दोन प्रजाती आणि घोडा, गेंडा, आशियाई वानर या प्राण्यांमधील प्रजाती गमावल्या. कारण पर्यावरणात झालेले मोेठे बदल. यात समुद्री पातळीतील बदलही कारणीभूत आहे.
मी स्वतः या संशोधनात सहभागी आहे. या हाडांचे वय आम्ही खूप महत्प्रयासाने काढले. कारण इतक्या जुन्या हाडातून संशोधनासाठी कार्बन काढणे अशक्यप्राय होते. इतक्या जुन्या हाडांचा जवळजवळ दगडच झालेला असतो. पुण्यातील राष्ट्रीय विज्ञान संस्था (आयसर) तसेच आयआयटीएम या संस्थांमध्ये यावर सखोल संशोधन सुरू आहे. तेथील मातीचे नमुने, तेेथील पर्यावरण त्या काळात नेमके कसे होते याचा शोध घेणे सुरू आहे. यावरचा बराच अभ्यास अजून बाकी आहे.

-डॉ. प्रतीक चक्रवर्ती, संशोधक डेक्कन कॉलेज, पुणे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button