धार्मिक

देवीची शक्तीपीठं एक्कावन्नच का? त्यांची उत्पत्ती कशी झाली?


शारदीय नवरात्रीत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चन्द्रघंटा, कूष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या देवीच्या ९ रूपांची रोज यथासांग पूजा केली जाते.



नऊ दिवस युद्ध करून देवीने महिषासूराचा वध केला व सर्वांनाच त्याच्या त्रासातून मुक्त केले. या आनंदाप्रित्यर्थ आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजया दशमी’ असा नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

सप्तशती पोथीनुसार…

देवी तमोगुण, रजोगुण, सत्वगुण या तिन्हीही गुणांनी युक्त आहे. हिंदू धर्मात श्री महाकाली श्री महालक्ष्मी व श्री महासरस्वती यांची पूजा केली जाते. श्री महाकालीचं उग्र, संहार करणारी, दैत्यांना मारणारी तमोगुणी रूप आहे. श्री महालक्ष्मी रजोगुणी रूप आहे. महालक्ष्मी ही वैभव संपत्तीचे प्रतिक आहे. ब्राहमी, माहेश्वरी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा, धनलक्ष्मी व महालक्ष्मी या देवीच्या अष्टशक्ती आहेत. श्री महासरस्वती देवीचे सात्त्विक रूप. सप्तशती या पोथीमध्ये या देवींच्या तीनही रुपांचे वर्णन केले आहे. दुर्ग’ नावाच्या राक्षसाचा तिने वध केला म्हणून तिला दुर्गा म्हणू लागले. देशभर देवीची सर्वत्र मंदिरं आहेत. पण त्यातील एकावन्न शक्तीपीठं (स्थानं ) विशेष प्रसिद्ध आणि जागृत का मानली जातात. यामागील एक पौराणिक कथा…

देवी पुराणानुसार…

‘दक्ष’ राजाची मुलगी ‘सती’ या नावाने पार्वतीने एक अवतार घेतला. दक्ष राजा हा धार्मिक वृत्तीचा होता. दक्ष राजाने सतीचा विवाह शिवशंकरा बरोबर लावून दिला. एकदा राजा प्रजापती यज्ञ करीत असताना तेथे दक्ष राजा गेला. तेव्हा लगेचच सर्वांनी उठून सन्मानाने दक्ष राजाला आसन दिले. फक्त शिवशंकर व ब्रह्मा यांनी त्याला आसन दिले नाही व त्यांचा सन्मानही केला नाही. तेव्हा पासून दक्ष राजा व शिवशंकर यांच्यात वैर निर्माण झाले. पुढे राजा दक्ष जेव्हा प्रजापती झाला तेव्हा त्याने गंगेच्या काठी मोठा यज्ञ केला. त्याने सर्वांना निमंत्रण दिले. फक्त मुद्दाम आपली मुलगी ‘सती’ व जावई शिव शंकर यांना बोलाविले नाही. सतीला मात्र आपल्या वडिलांच्या यज्ञाला उपस्थित राहण्याची इच्छा होती. सतीला शिव शंकराने सांगितले, तुझ्या वडिलांनी फक्त आपल्यालाच बोलावले नाही. पण माहेरी आपल्या वडिलांकडे जाण्यास निमंत्रण कशाला पाहिजे, असा विचार करून सती दक्ष यांच्याकडे जाण्यास निघाली. सतीच्या हट्टामुळे जाताना शिव शंकराने नंदी व काही शिवगण तिच्या बरोबर पाठविले. जेव्हा यज्ञ मंडपात सती पोहचली तेव्हा कोणीही तिला विचारले नाही. सतीचे स्वागतही केले नाही. प्रत्यक्ष दक्ष राजानेही आपल्या मुलीकडे दुर्लक्ष केले. यामुळे सती खूप अपमानित झाली. पती शिवशंकराला न बोलवता यज्ञ केल्याबद्दल चिडली. असे अपमानित होऊन परत जाण्यापेक्षा पिता दक्षाने प्रज्वलित केलेल्या धगधगीत यज्ञकुंडात सतीने देह अर्पण केला. नंदीला एकटाच परत आलेला पाहून शिवशंकराला तेथे नेमके काय घडले असावे याची कल्पना आली. त्याने वीर भद्राला दक्षाच्या यज्ञाची नासधूस करायला सांगितले. वीरभद्राने यज्ञ मंडपच तोडून टाकला. त्या यज्ञात जळलेले पार्वतीचे अर्थात सतीचे शव खांद्यावर घेऊन शिवशंकर भारतभर भ्रमण करीत राहिले.

शंकर दुःखाने असे फिरत आहेत हे विष्णूला योग्य वाटेना. विष्णूने आपले प्रभावी अस्त्र फेकून त्या सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. आणि ते सर्वत्र भारतभर विखुरले गेले. जेथे जेथे शरीराचे तुकडे विखुरले गेले व त्याठिकाणी देवीची मंदिरे तयार झाली. या सतीचे मस्तक हिमाचल प्रदेशात ‘ज्वालजी’ येथे पडले तेथील मंदिरात देवीची मूर्ती नसून फक्त जमिनीतून ज्वालाच बाहेर येतात. यातूनचं देवीच्या एकूण ५१ जागृत शक्तीपीठाची उत्पती झाली अशी पौराणिक मान्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button