विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ३८ कोटींचे मालक

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. नार्वेकर हे तरूण विधानसभा अध्यक्ष आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत.

राहुल नार्वेकर ( वय ४५ ) हे पेशाने वकील आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचे काम केले. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करत असत. मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचे काम राहुल नार्वेकर करत होते. पुढे राहुल नार्वेकर यांना शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही पाठवले जाऊ लागले.

राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते. राहुल नार्वेकर यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून येत असत. त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत.

राहुल नार्वेकर यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पण लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. तर 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुलाब्यातून त्यांनी काँग्रेसचे अशोक जगताप यांचा पराभव करून विधानसभा निवडणूक जिंकली.

सन २०१९ मध्ये कुलाब्यातून भाजपाच्या तिकिटावर ते विधानसभा निवडणूक जिंकले, यावेळी राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाला जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात सुमारे ३८ कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं सांगितलं होतं.राहुल नार्वेकर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या एकूण संपत्तीपैकी केवळ ३९ लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या नावावर आहेत.

भाजपाच्या पाठिंब्याने सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तर कुलाब्यातील भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एकूण ३८ कोटींचे मालक आहेत. राहुल नार्वेकर हे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच प्रमुख पक्षांचे सदस्य राहिले आहेत.

राहुल नार्वेकर यांच्याकडे मर्सिडीज बेंझ, इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा एक्सयूव्ही आणि मारुती ८०० अशी चारचाकी वाहने आहेत. याशिवाय त्यांच्याकडे आलिशान गल्फ ३१ पॉवर बोटदेखील आहे. देशातील कोणत्याही सभागृहातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावाची नोंद झाली आहे