ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मग महापुरुषांच्या ‘त्या’ बदनामीवर गप्प का?


शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास विलंब का झाला, याविषयी प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेश पनवेल सत्र न्यायालयाने नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नुकतेच दिले.
या पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवरून महापुरुषांविषयी उघडपणे केल्या जाणाऱ्या वादग्रस्त आक्षेपार्ह व बदनामीकारक लेखनाचा विचार होणे गरजेचे आहे. अशा लेखनामुळे वादंग निर्माण होऊ लागले आहेत. जातीय आणि धार्मिक द्वेषाच्या ठिणगीने सामाजिक वातावरण प्रदूषित होत आहे. महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे बोलले, लिहिले जात आहे. एवढेच नव्हे तर देशाचा अपमान करणारी वक्तव्येसुद्धा पुढे येऊ लागली आहेत. मानवतेचे हक्क नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे समर्थन केले जात आहे. संविधानाचा अपमान केला जात आहे.



यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असताना, प्रत्यक्षात सरकार मात्र गप्प आहे, हे समर्थन समजावे का? महापुरुषांची बदनामी करणारी विकृत व्यक्ती छोटी असो किंवा लोकांच्या हृदयात विराजमान असो दोन्ही व्यक्तींना शासन तर व्हायलाच हवे ना? महापुरुषांच्या बाबत चुकीची वक्तव्य त्यांची महापुरुषांची बदनामी करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत भाषणे देत सुटले आहेत. अशा भाषणांना विरोध होत आहे, मात्र समर्थन करणारे सुद्धा रस्त्यावर येऊन आंदोलन करू लागले आहेत. अशा व्यक्तींच्या समर्थनार्थ आंदोलन केली जाणे, ही खेदाची बाब आहे. समाज सुधारकांनी महाराष्ट्रात केलेले परिवर्तन अशा लोकांना मान्य नाही का? म्हणून डोळे झाकून महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर अंध विश्वास ठेवला जात आहे.

आणखी वाचा-विज्ञानाच्या क्षेत्रातला लिंगभेद

समाजमाध्यमांवरील पोस्टमुळे भावना दुखावल्या गेल्याने एखाद्याला चोप देणे, आंदोलने करणे अशा प्रकारे जनभावना अगदी ज्वालामुखीसारख्या बाहेर पडताना दिसतात. हा आक्रमकपणा गरजेचाच, परंतु तो महाराष्ट्रात ज्यांच्याकडून वारंवार महापुरुषांची बदनामी करणारी वक्तव्ये केली जातात, अशा व्यक्तींच्या विरोधातसुद्धा दिसला पाहिजे. अशा लोकांवर सुद्धा कारवाई व्हावी. अशा वेळी आक्रमकपणा का दिसून येत नाही? उलट अशा व्यक्तींना संरक्षण दिले जाते. हा महापुरुषांच्या बाबतीतील दुटप्पीपणा नव्हे का? बदनामीकारक वक्तव्ये कोणी केली, का केली, हे समस्त महाराष्ट्र जाणून आहे. आदरणीय समजल्या गेलेल्या व्यक्तीला केंद्रबिंदू मानून त्या व्यक्तीच्या इशाऱ्यांवर चालणाऱ्या अशा समर्थकांना महापुरुषांशी काहीच देणे घेणे नसते.

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श आहेत, परंतु यांची बदनामी कोणी केली, कोण करत आले आहे, कशासाठी केली जात आहे हे जाणून न घेणारे मेंदू जातीय आणि धार्मिक दंगलीत गहाण पडलेले आहेत. त्यामुळेच खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करणारी विकृती समाजातील काही घटकांत आहे. नक्की खरे आणि खोटे काय याविषयी सामान्यांचा गोंधळ उडावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. महापुरुषांनी जातव्यवस्था, धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांवर आघात केल्याने धर्म धर्म करणारेही महापुरुषांना बदनामच करणार ना? महापुरुष समजून घ्यायचेही नाहीत व द्यायचेही नाहीत.

आणखी वाचा-आठवणींतले ‘नम्बी’..

अलीकडे अनेकजण स्वत:ला इतिहाससंशोधक समजू लागले आहेत. हे सगळं का आणि कोणासाठी चालले आहे? स्त्री शिक्षणाचे आधारस्तंभ म्हणून महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याकडे पाहिले जाते. इथल्या वर्ण व्यवस्थेच्या विरोधात जाऊन कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून नव्हे तर शिक्षण देऊन शैक्षणिक चळवळ गतिमान केली. परंतु आजही त्यांच्याबाबत मुद्दाम बदनामीकारक वक्तव्ये केली जातात. समाज सुधारकांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले. समता, बंधुता नाकारणाऱ्या समाजात धर्माचे वर्चस्व असलेल्या लोकांना मानवतेची व्याख्या समजावून सांगणे सोपे नव्हते. त्यासाठी संघर्षच करावा लागणार होता. महापुरुषांचा, समाजसुधारकांचा हा संघर्ष लढवय्याप्रमाणे होता. त्या काळात ते लढले म्हणून तर आजचा आपला काळ सुकर झाला आहे. त्यांच्या कार्याशी आजच्या काळातील कोणत्याही व्यक्तीशी तुलना होऊ शकत नाही. आज तेढ नेमके कोण निर्माण करत आहे, यामागचे मास्टर माईंड नक्की कोण आहेत, हे सुजाण नागरिकांनी समजून घ्यायला हवे.

आज अनेक ज्ञानी आपले ज्ञान समाजात पाजळताना दिसतात. तेच खरे मानून लोकासुद्धा ब्रेन वॉश झाल्यासारखे वागू लागले आहेत. हे समाजाला परवडणारे नाही. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना कायदेशीर मार्गाने शासन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

आणखी वाचा-‘दु:ख विक्री केंद्र’

धर्मकारण साध्य होणार नाही, म्हणून महापुरुषांचे कर्तृत्व, त्यांच्या कार्याला कमी लेखत बदनामीचे षडयंत्र रचले जात आहे.ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या नेत्यांबरोबर केली जात असते, महापुरुषांच्या खऱ्या इतिहासाला बगल देत खोटा इतिहास सांगण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ लागली आहे, त्यात अनेकजण स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेत आहेत.

आधी वादग्रस्त विधान करायचे आणि वाद तापल्यानंतर सारवासारव करायची हे नित्याचेच झाले आहे. हे उशीरा सुचलेले शहाणपण असते. अशा वक्तव्यांच्या विरोधात जनतेची आक्रमकता कुठे गायब होते. अशावेळी गप्प का? अशा वक्तव्यांचा आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या विधानांचासुद्धा समाचार घेण्याची गरज आहे. एकवेळ महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाता आले नाही तरी चालेल परंतु जिथे ज्या विकृतीकडून महापुरुषांची बदनामी होत असेल, त्या प्रत्येक विकृतीच्या विरोधात व्यक्त झालेच पाहिजे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button