ताज्या बातम्यामहाराष्ट्र

फेडरेशनचा खरेदी केलेला 7 हजार क्विंटल धान गायब!, या तीन संस्था रडारवर


गोंदिया : तिरोडा, गोंदिया, आमगाव आणि गोरेगाव चार तालुक्यांमध्ये मार्केट फेडरेशन धान खरेदी करतो. आदिवासी विकास महामंडळ सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, देवरी आणि सालेकसा या चार तालुक्यांत धान खरेदी करते. गोंदिया जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करण्यात येतो. खरेदी करण्यात आलेला तब्बल 7 हजार क्विंटल धान संबंधित संस्थांच्या गोदामात उपलब्ध नाही. ही धक्कादायक बाब राज्यस्तरीय भरारी पथकाने केलेल्या तपासणीत उघडकीस आली आहे. त्यामुळे गोरेगाव तालुक्यातील तीन संस्था पुन्हा रडारवर आहेत. या तिन्ही संस्थावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.



धानाची परस्पर विल्हेवाट

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. फेडरेशन सहकारी संस्थांना कमिशन तत्त्वावर धान खरेदी करण्यास परवानगी देते. यासाठी संबंधित संस्थाकडून बँक गॅरंटी आणि 10 लाख रुपये डिपॉझिट घेतले जातात. मात्र, यानंतर मागील वर्षी जिल्ह्यातील पाच संस्थांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची परस्पर विल्हेवाट लावली होती.

 

चार राज्यस्तरीय पथकं जिल्ह्यात दाखल

याप्रकरणी या संस्थांवर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. पण यानंतरही धान खरेदीतील गैरप्रकार थांबत नसल्याचे चित्र आहे. खरीप आणि रब्बी हंगामात खरेदी केलेल्या धानाची तपासणी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मार्केटिंग फेडरेशनचे चार राज्यस्तरीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या पथकाने दोन दिवसांत जिल्ह्यातील काही संस्थांच्या गोदामाला भेट दिली. खरेदी केलेला धान गोदामात आहे किंवा नाही, याची चाचपणी केली.

खरेदी केलेला धान गोदामात नाही मग कुठे?

यात गोरेगाव तालुक्यातील तीन संस्थांच्या गोदामामध्ये खरीप हंगामात खरेदी केलेला जवळपास 7 हजार क्विंटल धान नसल्याची बाब उघडकीस आली आहे. ही बाब या पथकाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. खरेदी केलेला धान गोदामात नाही. शिवाय या संस्थांना वांरवार धान जमा करण्याच्या सूचना करूनही त्या जमा करीत नाहीत. त्यामुळे आता या संस्थांना नोटीस बजावून धान जमा न केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

तिरोड्यातील तीन केंद्रावर धानाचे गौडबंगाल

तिरोडा तालुक्यातील सुद्धा तीन धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानापेक्षा प्रत्यक्षात तीन हजार क्विंटलवर धान कमी असल्याची बाब उघडकीस आली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर या केंद्रांना सुद्धा नोटीस बजावून तफावत असलेला धान जमा करण्याची नोटीस फेडरेशन बजावणार आहे. त्यानंतर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. भरारी पथकाच्या चौकशीत धान खरेदी केंद्रांचा बराच अनागोंदी कारभार पुढे येण्याची शक्यता आहे.

गोंदिया जिल्ह्यातील 177 केंद्रांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबईतर्फे 4 भरारी पथके पाठविण्यात आली आहेत. चार उड्डाण पथकांचे पथक 177 केंद्रांची तपासणी करणार आहेत. जिल्ह्यात पणन महासंघ आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने 177 केंद्रांना मान्यता दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button