ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर शुक्रवारी परिचारिकांचा मोर्चा


मुंबई: पहिल्या, दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा मोबदला पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ द्यावा, सर्व संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरावी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, सहाय्यक परिचारिका प्रसविका, समन्वयक, आया कमर्चाऱ्यांसाठी रजा राखीव पदे तात्काळ निर्माण करावी, डॉक्टरांच्या उपस्थितीविना नियमित लसीकरण कार्यक्रमाची सक्ती करू नये, आदी विविध मागण्यांसाठी जागतिक परिचारिका दिनी, १२ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागातील सहाय्यक परिचारिका प्रसविका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयातील कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागातील सहाय्यक परिचारिका प्रसविका आणि सार्वजनिक आरोग्य परिचारिका यांचे विविध प्रश्न आणि मागण्या मागील अनेक महिन्यांपासून दि म्युनिसिपल युनियनच्या माध्यमातून प्रशासनासमोर मांडण्यात येत आहेत. मात्र त्यांच्या मागण्या आणि प्रश्न सोडविण्याबाबत प्रशासन अनास्था दाखवत आहे. त्यामुळे परिचारिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.



परिणामी, परिचारिकांमध्ये असंतोष धगधगू लागला आहे. या सर्व मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी परिचारिका दिनाचे औचित्य साधून १२ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयातील कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढण्यात येणार आहे. सकारात्मक निर्णय न झाल्यास, होणाऱ्या सभेमध्ये पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती दि म्युनिसिपल युनियन सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिली.

प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे

पहिल्या दुसऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा मोबदला पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ द्यावा.
आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध कराव्या.
सर्व संवर्गाची रिक्त पदे त्वरित भरावी.
पी.एच.एन. संवर्गाची रिक्त पदे ए.एन.एम. संवर्गातून पदोन्नतीने तात्काळ भरावी.
सार्वजनिक आरोग्य परिचारिका, सहाय्यक परिचारिका प्रसविका, समन्वयक, आया कमर्चाऱ्यांकरिता रजा राखीव पदे तात्काळ निर्माण करावी.
इंटरनेटकरिता लागणारे शुल्क आगाऊ देण्यात यावे.
डॉक्टरांच्या उपस्थितीविना नियमित लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्याची सक्ती करू नये.
प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये संगणक चालकाचे पद निर्माण करून भरती करावी.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button