कोविडच्या विळख्यात मुंबई! प्रशासन अलर्टवर..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात ठाणे, पुणे आणि मुंबईत कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगाने केलं आहे.

तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर सांगितले की, “राज्यात संसर्ग नक्कीच वाढला आहे, परंतु हा एक नवीन प्रकार आहे जो फारसा जीवघेणा नाही. राज्यातील साडेतीन हजार सक्रिय रुग्णांपैकी केवळ 52 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी एकही ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर नाही. महाराष्ट्रात ते फक्त 6 जिल्ह्यांमध्ये वाढले आहे, जिथे सुमारे दहा हजार चाचण्या केल्या जात आहेत.”

यासोबतच आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात टेस्टिंग किटचा तुटवडा नाही. बूस्टर डोससाठीही केंद्राशी बोलणी सुरू असून, सूचना येताच त्यासाठी आवश्यक काम सुरू केले जाईल. लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे, मात्र त्यासाठी अद्याप अधिसूचना जारी करावी, अशी परिस्थिती नाही. भेटीगाठी आणि प्रवासावर कोणतेही बंधन घालण्याची गरज नाही. राज्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर दोन्ही पुरेशा आहेत, यासाठी सर्वसामान्य आणि विशेष सर्वांना आवाहन आहे की, काळजी घ्यावी.