पक्षाने आदेश दिल्यास जिल्ह्यात कुठेही लढणार! : अमृता पवार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नाशिक : (आशोक कुंभार ) भाजपाने आदेश दिल्यास जिल्ह्यात कुठेही आणि कुठलीही निवडणूक लढेन अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर त्या येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दौऱ्यावर आल्या होत्या. भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले, यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आपण भाजपमध्ये प्रवेश का केला या प्रश्नावर पवार म्हणाल्या, माझ्या वडिलांनी राष्ट्रवादीचे कार्यालय आमच्या हॉस्पिटलमध्ये सुरू केले होते.त्या कार्यालयावर पेट्रोलचे बोळे टाकण्यात आले. अनेक प्रकारे आम्हांला टार्गेट करण्यात आले. माजी पालकमंत्री भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या आईला आणि मलाही त्रास देण्यास सुरुवात केली.

त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज आपल्या देशात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून भाजपत अनेक युवक प्रवेश घेत आहेत. देशात, राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले काम सुरू असून देशाची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केल्याने युवकांचा ओढा त्यामुळे भाजपाकडे वाढत चालला असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीबाबत त्या म्हणाल्या भाजपचे पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो मला मान्य राहिल. जिल्ह्यात आपण विधानसभा असो की लोकसभा ती तन मन धनाने लढवेन. दरम्यान भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर कोटमगाव येथे जगदंबा मातेचे दर्शन घेतले.

याठिकाणी त्यांचा जगदंबा देवस्थानतर्फे विश्वस्त रावसाहेब कोटमे, व्यवस्थापक राजेंद्र कोटमें यांनी सत्कार केला. भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष समीर समदडीया, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे, प्रांतिक सदस्य बाबासाहेब डमाळे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी धसे, युवा तालुकाध्यक्ष संतोष केंद्रे, माजी तालुकाध्यक्ष राजू परदेशी, युवा मोर्चाचे नानासाहेब लहरे, युवराज पाटोळे, चेतन धसे, बाळासाहेब साताळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.