विद्यार्थ्यांची एक-एक हजार रुपये जमा करुन आपल्या वर्ग मित्राला वाढदिवसानिमित्त 15 हजार रुपयांचा देशी कट्टा गिफ्ट म्हणून देण्याची धक्कादायक योजना..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नांदेड : ( आशोक कुंभार ) शिक्षणाचं मंदिर असलेल्या शाळांमध्ये चक्क मुलांच्या ‘गॅंग’ तयार होत आहे. एवढच नाही तर ही मुलं दप्तरात खंजीर अन् एअर गन बाळगत असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. तर सिनेमा, वेब सिरीज आणि थ्रीलिंग गेम पाहून या विद्यार्थ्यांची वृत्ती एवढी हिंसक होत आहे की, भविष्यात शाळांमध्ये ‘गॅंगवार’ झाला तर नवल वाटू नयेत.

‘लोकमत’ वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार नांदेड शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तरात खंजीर असल्याने दुसऱ्या गटातील मुलांनी देखील खंजीर विकत घेतले. एवढच नाही तर एका गटातील विद्यार्थ्यांनी पालकांनी खाऊला दिलेले पैसे जमा करून छऱ्यांची बंदूक विकत घेतली. तसेच तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्या बंदुकीच्या माध्यमातून शाळेत आपली दादागिरी चालविली. विद्यार्थ्यांच्या हाती छऱ्यांची बंदूक आणि खंजीर आढल्याचे कळताच शाळा प्रशासनाला धक्काच बसला. शाळा प्रशासनाने तत्काळ याची माहिती पालकांना देऊन त्यांना शाळेत बोलावून घेतले. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून पालकांच्या पायाखालीची वाळूच सरकली.

बहुतांश विद्यार्थी सुशिक्षित कुटुंबातील

याबाबत शिक्षकांनी अधिक चौकशी केली असता, धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहे. या विद्यार्थ्यांनी शंभर रुपयांना खंजीर विकत घेतले, त्यानंतर तीन हजार रुपयांमध्ये छऱ्याची बंदूक खरेदी केली. शाळेत आपली दहशत निर्माण करण्यासाठी दररोज ही मुले दप्तरात खंजीर आणि एअर गन बाळगत होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे सुशिक्षित कुटुंबातील आहेत. विशेष म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतील विद्यार्थ्यांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका शाळेत हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

देशी कट्टा घेण्यापूर्वीच बिंग फुटले

दरम्यान याचवेळी यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘गॅंग’ करून राहणाऱ्या एका गटातील विद्यार्थ्यांनी एक-एक हजार रुपये जमा करुन आपल्या वर्ग मित्राला वाढदिवसानिमित्त 15 हजार रुपयांचा देशी कट्टा गिफ्ट म्हणून देण्याची योजनाही आखली होती. यासाठी पैश्यांची जुळवाजुळव देखील करण्यात येत होती. मात्र त्याआधीच शिक्षकांना या सर्व प्रकारची माहिती मिळाली आणि त्यांचे बिंग फुटले.