ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडींचे नियंत्रण कसे कराल?


भारतामध्ये कपाशीवर २५२ किडींची नोंद आहे. तुडतुडे, फुलकिडे, मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत. या किडींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास होणारे नुकसान टळेल आणि रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होईल.
एकात्मिक कीड व्यवस्थापन



लागवडीअगोदर

शेतातील मागील हंगामातील पऱ्हाट्याची विल्हेवाट लावावी. त्यात मागील हंगामातील किडीच्या अवस्था राहतात.
खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीतील किडीच्या अवस्था वर येऊन प्रखर सूर्यप्रकाशाने मरतील किंवा त्यांना पक्षी खातील.
कपाशीच्या शेताच्या जवळपासच्या परिसरातील किडीच्या यजमान वनस्पती जसे पेठारी, कोळशी, गाजरगवत, धोतरा, कंबरमोडी, रानभेंडी, रूचकी, कडूजिरे इ.चा बंदोबस्त करावा.
लागवड करतेवेळी

रोग व रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकारक्षम / सहनशील आणि कमी कालावधीच्या वाणांची निवड करावी.
पीक फेरपालट करावी. त्यामुळे किडींना सतत खाद्य उपलब्ध होणार नाही व त्यांच्या जीवनक्रमात खंड पडेल.
लागवड शिफारस केलेल्या अंतरावर करावी.
रासायनिक खतांचा शिफारसीनुसार वापर करावा. नत्रयुक्त खताचा अतिरीक्त वापर केल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
मका, चवळी, उडीद, मुग, सोयाबीन, ज्वारी यासारखी आंतरपीके किंवा मिश्र पिके घेतल्यास कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होते.
लागवडीनंतर

पहिली रासायनिक किटकनाशकाची फवारणी जेवढी लांबता येईल, तेवढी लांबवावी. त्यामुळे मित्र किटकांचे संवर्धन होईल.
पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
शेताची कोळपणी व खुरपणी किंवा तणनाशकाचा वापर करून पिकाच्या सुरुवातीची ८ ते ९ आठवडे तणांचे व्यवस्थापन करावे.
पिवळे व निळे चिकट सापळे (१.५ x १.० फूट) प्रत्येकी ६-८ सापळे प्रति एकर क्षेत्रात पीकाच्या एक फुट उंचीवर लावावे.
जैविक कीटकनाशकाचा वापर

कीड

कीटकनाशक

मात्रा / १० लि. पाणी

रस शोषण करणाऱ्या किडी, बोंडअळ्या

निंबोळी अर्क

५ टक्के

पांढरी माशी

व्हर्टिसिलीयम लिकॅनी १.१५ % डब्ल्युपी

५० ग्रॅम

फवारणीसाठी रासायनिक कीटकनाशके

कीड

कीटकनाशके

प्रमाण / १० लि. पाणी

मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी

फ्लोनिकॅमीड ५०% डब्ल्युजी किंवा

३ ग्रॅम

बुप्रोफेझिन २५% एससी किंवा

२० मिली

डायनोटेफ्युरॉन २० डब्ल्युजी किंवा

३ ग्रॅम

थायामिथॉक्झाम २५ डब्ल्युजी किंवा

२ ग्रॅम

इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल किंवा

२ मिली

डायफेनथ्यूरॉन ५० डब्ल्युपी किंवा

१२ ग्रॅम

फिप्रोनील ५ एससी

३० मिली

फ़ुलकिडे

फिप्रोनील १८.८७ % एससी किंवा

७.५ मिली

स्पायनेटोरम ११.७० % एससी

८.४ मिली

पांढरी माशी

पायरीप्रोक्झीफेन १० ईसी किंवा

२० मिली

स्पायरोमेसिफेन २२.९ एससी

१२ मिली

महत्त्वाच्या सूचना :

वरील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.
कीटकनाशकाच्या डब्यावरील सूचना वाचून त्याचे पालन करावे व सुरक्षित हाताळणी व वापर करावा.
एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकाची मिश्रणे करू नये. तसेच कीटकनाशकासोबत विद्रव्य खते, संप्रेरके इत्यादी मिसळू नये.
फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू ५-७ असावा.
डॉ. बस्वराज भेदे, डॉ. खिजर बेग, श्री. गणेश सोनुले
कापूस संशोधन केंद्र, नांदेड


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button