फाईलबंद खुनांचा नव्याने तपास

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील फाईल बंद केलेल्या खुनांचा तपास पुन्हा नव्याने सुरू केला जाईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिला आहे पोलिसांनी नागरिकांच्या तक्रारीची योग्य ती दखल घेतली पाहिजे. तक्रारदार पोलिस ठाण्याची पायरी चढून आल्यावर त्याला पिण्याकरिता पाण्याची विचारणा करण्याचे सौजन्य पोलिसांनी दाखवावे, असेही ते म्हणाले. फुलारी यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांना भेटी देवून माहिती घेतली. तसेच पोलिस अधिकार्‍यांची स्वतंत्र बैठक घेवून गुन्हेगारीचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हेगारीत मागील वर्षाची तुलना केल्यास त्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात मटका, जुगारासह अवैध धंदे मोडित काढण्यात येत आहे.

वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि बांधकाम विभाग यांची एकत्रितपणे बैठक घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसातील सांगली पोलिस दलाची कामगिरी समाधानकारक आहे. गांजासह दरोडा, चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे. काही प्रलंबित गुन्हेही उघडकीस आणण्यात आले आहेत. मागील दोन ते तीन वर्षातील काही खून प्रकरणांचा छडा लागलेला नाही. त्यांच्या फायली पुन्हा उघडण्यास सांगितले आहे. गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपार, मोका, हद्दपार, स्थानबद्ध सारख्या कारवाईही प्रभावीपणे करण्यात आल्या आहे. अजूनही काही मोक्काचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत.

आरएफआयडी यंत्रणा तत्काळ सुरू करा

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलाच्या माध्यमातून सीसीटीव्हीसह अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. सांगलीत सुरू करण्यात आलेली परंतु सध्या बंद अवस्थेत असलेली आरएफआयडी यंत्रणा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी सूचना फुलारी यांनी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना केली. या यंत्रणेच्या माध्यमातून गस्तीपथकाचे लोकेशन समजण्यास नियंत्रण कक्षास मदत होणार आहे.