यशवंतराव चव्हाण : आधुनिक महाराष्ट्राचा सुसंस्कृत लोकनेता
यशवंतराव चव्हाण : आधुनिक महाराष्ट्राचा सुसंस्कृत लोकनेता
आधुनिक महाराष्ट्राचा कायापालट करण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, भास्करराव जाधव, प्रबोधनकार ठाकरे इत्यादीनी मोलाचे योगदान दिलेले आहे. स्वातंत्र्याच्या संक्रमण काळात उदयाला आलेले लोकनेते म्हणजे यशवंतराव चव्हाण! ज्यांनी स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, औद्योगिक, आर्थिक, विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृत लोकनेता म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला घडविण्यात यशवंतराव चव्हाण यांनी सर्वस्व समर्पित केले. यशवंतराव चव्हाण यांना काही फार मोठा ऐतिहासिक किंवा राजकीय वारसा नव्हता. अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे जन्मगाव देवराष्ट्रे हे आहे. ते गाव पूर्वी दक्षिण साताऱ्यात होते. आता ते सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात येते. यशवंतराव यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंतराव तर आईचे नाव विठाबाई होते. त्यांना तीन भावंड होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आई-वडिलांनी त्यांना शिक्षण दिले. यशवंतरावांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. विठामाऊलीने त्यांना मोठ्या कष्टाने शिकविले. त्यांना गरीबीचे खूप चटके सहन करावे लागले. पण ते डगमगले नाहीत तसेच निराश किंवा हातात झाले नाहीत. शिक्षण हाच मोठा अशेचा किरण आहे. हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने त्यांना शिकविले होते. महात्मा फुले, क्रांतीसिंह नाना पाटील, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव सुरुवातीच्या काळात यशवंतरावांवर होता. जगण्याची, लढण्याची, शिकण्याची, स्वाभिमानाची शिकवण सत्यशोधक चळवळीने महाराष्ट्राला दिली. यशवंतराव चव्हाण यांना ती मिळाली.
यशवंतराव चव्हाण यांचे शालेय शिक्षण कराड शहरात झाले. कराडत शिक्षण घेत असताना 1930 साली त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत भाग घेतला. 1932 साली त्यांनी तिरंगा झेंडा फडकविला म्हणून त्यांना 18 महिन्यांची शिक्षा झाली. बालपणापासूनच त्यांचा पिंड लढवय्या होता. तुरुंगात असताना त्यांचा मार्क्सवाद आणि रॉयवादाशी संबंध आला. पण ते पुढे गांधीवादापाशी येऊन थांबले. सत्यशोधक, मार्क्सवाद, रॉयवाद ते गांधीवाद असा त्यांचा प्रवास आहे. या सर्व स्वातंत्र लढ्यात त्यांनी शिक्षणाची कास मात्र सोडली नाही.
यशवंतरावांनी कराडात शालेय शिक्षण घेतले. तर कोल्हापुर येथे बीए पूर्ण केले. पुण्यातून 1941 साली एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले. 1942 साली फलटण येथील वेणुबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सुरुवातीला कराडच्या कोर्टात त्यांनी वकिली केली. ते सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. पुढे त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला.
मुंबई प्रांताच्या दक्षिण सातारा मतदारसंघातून यशवंतराव निवडून गेले. १९५२ सालच्या निवडणुकीत ते निवडून आल्यावर मुंबई प्रांताचे पुरवठा खात्याचे मंत्री झाले. त्यांनी आयुष्यभर लोकं कल्याणकारी कार्य केले. 1956 साली ते द्विभाषिक मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले. सलग चार वर्षे म्हणजे 1960 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यशवंतराव चव्हाण हे स्वतंत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ख्याती होती. ते सुमारे साडेसहा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण केली. अत्यंत कमी काळात त्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले. मुळात ते अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे सरंजामी थाट नव्हता. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा बडेजाव नव्हता. त्यामुळे ते रचनात्मक काम करू शकले. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव पडला होता.
महाराष्ट्रासाठी भरीव कामगिरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना यशवंतरावांनी पंचायत राजच्या माध्यमातून त्रिस्तरीय व्यवस्था आणली. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही त्यांची त्रिस्तरीय व्यवस्था आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी टाकलेली ही महत्वपूर्ण पावले आहेत. प्रस्थापितांच्या ताब्यातून विस्थापितांच्या हातात सत्ता देण्याचा हा क्रांतिकारक निर्णय आहे. विशेषत: या पंचायतराजमध्ये विधिमंडळ आणि संसद सदस्यांना हस्तक्षेप करता येणार नाही. अशी तरतूद यशवंतराव चव्हाण यांनी केली. स्वपक्षीय आमदारांचा विरोध असताना देखील यशवंतरावांनी मोठ्या निर्धाराने महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राजची अमलबजावणी केली. आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून बहुजन समाजाचे लोकप्रतिनिधी निर्माण झाले. त्याचे श्रेय यशवंतराव यांच्या या निर्णयाला द्यावे लागेल. संसद विधिमंडळातील लोकप्रतिनिधी तयार करण्याची कार्यशाळा म्हणजे पंचायत राज आहे. संसदीय लोकशाहीचा पाया म्हणजे पंचायत राज आहे. याचा पाया महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांनी घातला.
पाणीपुरवठा योजना
पिण्यासाठी, शेतीसाठी आणि औद्योगिकीकरणासाठी पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पाणी हेच जीवन आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचा राज्यभर प्रचार केला. अनेक ठिकाणी नद्यावर बंधारे बांधले; परंतु प्रदीर्घकाळ आणि मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करण्यासाठी धरणांची नितांत गरज आहे. त्यासाठी त्यांनी कोयना आणि भीमा नदीवर धरण बांधले. सह्याद्री रांगांतील पडलेले पाणी कर्नाटकात व तिथून समुद्रात जात होते. त्यामुळे कोयना नदीवर धरण बांधले. ते आज 104 टी.एम.सीचे आहे. या धरणामुळे सातारा, सांगली जिल्ह्याचा व भीमेवरील उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा तालुक्याचा कायापालट झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी येथे भीमा नदीवर त्यांनी धरण बांधले. ते उजनी धरण ११७ टी.एम.सीचे आहे. या धरणाच्या उद्घाटन प्रसंगी यशवंतराव चव्हाण म्हणाले, “अरे पांडुरंगा तुझी चंद्रभागा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मी अडवलेली आहे, माझ्यावर रागवू नको, मला माफ कर.” आज उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्याचा कायापालट झालेला आहे. सोलापूर जिल्हा हा देशातील सर्वाधिक ऊस उत्पादक जिल्हा झालेला आहे. त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण यांनाच द्यावे लागेल.
शेती क्षेत्रात यशवंतरावांनी मोठी क्रांती केली. भूमीहीनांना जमिनीची वाटप केले. ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा त्यांनी आणला. बाजारात काय विकते ते शेतकऱ्यांनी पेरले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. शेतीच्या आधुनिकीकरणाला त्यांनी चालना दिली. शेतकरी व्यापारी झाला, तर शेतकऱ्यांचे कल्याण होईल हा विचार त्यांनी मांडला.
यशवंतरावांनी सहकार वृद्धिंगत केला
यशवंतराव चव्हाण यांनी सुमारे अठरा (18) सहकारी साखर कारखाने उभारले. भांडवली अर्थव्यवस्था ही सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त नाही, सहकारी अर्थव्यवस्था वृद्धिंगत झाली पाहिजे, यासाठी सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संघ, सहकारी कुक्कुटपालन, सहकारी सूतगिरणी उभारण्यास त्यांनी चालना दिली. परंतु आज सहकारी संस्थांचे मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होत आहे, ही चिंतेची बाब आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, केशवराव विचारे, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, विठ्ठलराव विखे पाटील, शंकरराव मोहिते इत्यादींनी उभारलेला सहकार आज मोडून त्याचे खाजगीकरण करण्याचा सपाटा आज महाराष्ट्रात सुरू आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील रचनात्मक कार्य
गरीब मुलांना शिक्षण मोफत मिळावे, यासाठी यशवंतरावांनी 1200 (बाराशे) रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना सवलत लागू केली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात गरिबांची मुले शिक्षण घेऊ लागली. पूर्वी मुंबई, पुणे, नागपूर अशी काही मोजकीचे विद्यापीठ होती. त्यामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील मुलं उच्च शिक्षणापासून कोसोमैल दूर होती. ही समस्या दूर करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मराठवाडा विद्यापीठ (आत्ताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) स्थापन केले. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलांना जे शिक्षण घेता येते, त्याचे श्रेय यशवंतरावांना द्यावे लागेल, त्यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण केले.
ग्रामीण भागातील मुलांना सैनिकी शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांनी सातारा येथे सैनिकी स्कूलची स्थापना केली. भारतीय सैन्य दलासाठी त्यांची ही योजना आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरी
महाराष्ट्र भारताचा खडगहस्त आहे. कारण महाराष्ट्राला जशी शौर्याची परंपरा आहे, तशीच सांस्कृतिक परंपरा देखील आहे. स्वामी चक्रधर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत ज्ञानदेव ते संत तुकाराम महाराज अशी मोठी परंपरा आहे. मराठी भाषा, साहित्य प्रबोधन असा खूप मोठा वारसा आहे. तो जतन करून वृद्धिंगत करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी मराठी साहित्य व संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि भाषा संचलनालय यांची स्थापना केली. यशवंतरावांचे हे कार्य अत्यंत महत्वपूर्ण आहे. हे त्यांचे कार्य इतर राज्यांसाठी देखील दीपस्तंभासारखे आहे. महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भाषिक, साहित्यिक वारसा जतन करून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य यशवंतराव यांनी केले.
यशवंतराव चव्हाण जसे राजकारणी होते, तसेच ते साहित्यिकदेखील होते. त्यांचे वाचन अफाट होते. साहित्यात त्यांना अभिरुची होती. त्यांनी विपुल लेखन केले. ‘आपले नवी मुंबई राज्य,’ ‘ऋणानुबंध,’ ‘सह्याद्रीचे वारे’ आणि ‘युगांतर ‘ इत्यादी ग्रंथ लिहिले. ‘कृष्णाकाठ ‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. त्यांच्या व्यस्त कार्यातून त्यांनी केलेले दर्जेदार लेखन नव्या पिढीसाठी प्रेरणादायक आहे. त्यांनी साहित्यसंमेलने, नाट्यसंमेलने यांना प्रोत्साहन दिले. त्यांचे साहित्य हा आपल्या देशासाठी अनमोल ठेवा आहे.
शिवराय भिमरायांप्रति नितांत आदर
यशवंतराव चव्हाण यांना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रति नितांत आदर होता. शिवचरित्र लिहिण्यासाठी अनेक अभ्यासकांना त्यांनी प्रोत्साहन दिले, मदत केली. अनेक ठिकाणी शिवरायांचे पुतळे उभारले. त्यांनी शिवरायांच्या नावाने कोल्हापूर या ठिकाणी विद्यापीठ उभारले.
नागपूर येथे दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. नव बौद्धांना शिक्षण आणि नोकरीतील सवलती कायम ठेवण्यासाठी त्यांनी मोलाची कार्य केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन 14 एप्रिल या दिवशी सार्वजनिक सुट्टी सुरू केली.
महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात योगदान
आज देशभरातील तरुण नोकरीसाठी महाराष्ट्रात येतात. ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना यशवंतराव चव्हाण यांनी केली. पिंपरी चिंचवड, पुणे, कोल्हापूर, ठाणे इत्यादी ठिकाणी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
यशवंतराव केंद्रीय राजकारणात
यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री पदावर कार्यरत असतानाच 1962 साली भारत– चीन या देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. संरक्षणमंत्री कृष्णा मेनन यांनी राजीनामा दिला. तेव्हा पंतप्रधान नेहरू यांच्यापुढे संरक्षणमंत्री पदासाठी दुसरे नाव समोर आले यशवंतराव चव्हाण यांचे! हिमालयाच्या मदतीला कणखर, दणकट, धैर्यशाली, शौर्यशाली सह्याद्री! नेहरूंनी यशवंतरावांना पाचरण केले. यशवंतराव दिल्लीच्या राजकारणात देशाच्या रक्षणासाठी गेले. त्यांनी संरक्षण पदाची धुरा मोठे ताकतीने सांभाळली. भारत – चीन युद्ध थांबले त्यामुळे यशवंतरावांचा मुत्सद्दीपणा, धैर्य, दूरदृष्टी आणि नियोजन यांचा सर्वत्र गौरव झाला. 1965 साली भारत– पाक युद्ध सुरू झाले. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे युद्ध भारताने जिंकले. शिवरायांच्या या शूरवीराने देशाचे संरक्षण केले. यशवंतराव चव्हाण यांनी सैन्य दलात अनेक सुधारणा आणल्या.सैनिकांचे मनोबल वाढविणाऱ्या कार्यक्रमाला चालना दिली. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी अभिमानास्पद कार्य केले.
1966 साली यशवंतराव चव्हाण नाशिक लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले. त्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. 1970 ते 1974 पर्यंतचे देशाचे अर्थमंत्री होते. देशातील अनेक तनखे बंद केले. चलनवाढीला आळा घातला. देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले. 1974 ला ते देशाचे परराष्ट्र मंत्री झाले. मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान, विरोधी पक्षनेते, आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अशी त्यांची कारकीर्द आहे. काँग्रेसमध्ये फूट पडली. इंदिरा गांधी यांच्याबरोबर त्यांचे मतभेद झाले. पंतप्रधान पदाची चालून आलेली संधीची त्यांनी अभिलाषा बाळगली नाही. ते प्रखर राष्ट्रभक्त होते. ते प्रचंड स्वाभिमानी, निर्भीड होते. तेवढेच विनयशील होते. सत्ता त्यांच्या डोक्यात कधी गेली नाही. ते प्रचंड निस्वार्थी होते. त्यांनी संपत्ती कमावली नाही. कधीही भ्रष्टाचार केला नाही. नेता हा मालक किंवा हुकूमशहा नसतो, तर तो जनतेचा सेवक असतो. ही त्यांची राजनीती होती. त्यांनी सात पिढ्यांना पुरून उरेल,एवढी संपत्ती कमावली नाही. त्यांचे कोणत्या बँकेत खाते नव्हते. कोठेही प्लॉट, फ्लॅट, जमीन घेऊन ठेवली नाही. ते उपभोगशून्य लोककल्याणकारी लोकनेते होते.
यशवंतराव चव्हाण निष्कलंक, निर्व्यसनी, निस्वार्थी होते. ते अत्यंत सौजन्यशील होते. विरोधकांनी पातळी सोडून टीका केली तरी, यशवंतरावांनी त्यांना सभ्य भाषेतच उत्तर दिले. आपल्या विरोधकांशी सौजन्यशील भाषेतच बोलले पाहिजे हा दंडक त्यांनी आधुनिक राजकारणात घालून दिला. पत्नी वेणूताईवर त्यांचे खूप प्रेम होते. प्रत्येक कठीण प्रसंगी त्यांनी वेनुताईंचा सल्ला घेतला. त्यांनी पत्नीचा आदर सन्मान केला. निःस्वार्थी प्रतिमेचा नेता अशी त्यांची ख्याती आहे. अशा सुसंस्कृत लोकनेत्याचा 25 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्ली येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. याप्रसंगी ते ७१ वर्षांचे होते. कराड येथील कृष्णा कोयनेच्या संगमावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या स्थळाला प्रीतीसंगम असे म्हणतात. अशा महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
संकलन : डॉ.श्रीमंत कोकाटे