शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने शिवजयंती साजरी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात गडकिल्ल्यांसाठी 350 कोटी रुपयांची तसेच शिवनेरी येथे संग्रहालयासाठी 30 कोटींचा निधी मंजूर केला, त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

पुणे : नारायणगाव ( आशोक कुंभार )देश महासत्ता बनवण्यासाठी देशाचा, धर्माचा अभिमान बाळगून आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह जयवंतराव बाजी मोहिते यांनी केले.

शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने आयोजित शिवजयंती सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.

शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे, सेवानिवृत्त ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, अध्यक्ष आचार्य हेमंतराजे मावळे, उपाध्यक्ष शाहीर गणेश टोकेकर, सचिव रमेश कर्पे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह, स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष गोविंदराव हिंगे, सुनील काळे, ठाकरे गट शिवसेना संघटक शरद चौधरी, सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेचे अध्यक्ष संजय खत्री, मनसे नेते मकरंद पाटे, कुसुरचे सरपंच दत्तात्रय ताजणे, संदीप धनापुणे, संघचालक अरुण कबाडी, संजय मुथा, सुजाता काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवजन्मस्थळ इमारतीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाळणा हलवून शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर शिवकुंज स्मारकापर्यंत बालशिवबांच्या शिल्पाची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शिवकुंज स्मारकात राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांच्या शिल्पास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर धर्मसभा आयोजित करण्यात आली.

सेवानिवृत्त ब्रिगेडीयर प्रसाद जोशी यांच्या हस्ते गडदेवता शिवाई मातेस पूजा अभिषेक करण्यात आला. जोशी म्हणाले, छत्रपती शिवरायांचा बालपणीचा इतिहास, कार्यपद्धती, प्रशासन याची माहिती समाजासमोर आणणे महत्त्वाचे ठरेल. तसेच देश विश्‍वगुरू लवकरच बनेल त्याकरिता शिवरायांचे गुण अंगी बाळगले पाहिजेत.

यावेळी शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार जुन्नर येथील सामाजिक कार्यकर्त्या अलकाताई फुलपगार यांना महिला संघटन, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी प्रदान करण्यात आला.