ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

तूफान प्रतिसादानंतर हिंदीतही रिलीज होणार संगीतप्रधान ‘रौंदळ’


महाराष्ट्र: (आशोक कुंभार )मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला ‘रौंदळ’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे. लक्षवेधी टिझर आणि ट्रेलरसोबतच या चित्रपटातील सुमधूर गीतरचनांनी ‘रौंदळ’ येण्यापूर्वीच सर्वांच्या मनात कुतूहल जागवलं होतं.त्यामुळे तिकिटबारीवर गर्दी केलेल्या प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच ‘रौंदळ’ पाहण्यासाठी गर्दी केली. शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच झालेलं अॅडव्हान्स बुकिंग आणि नंतर झालेल्या करंट बुकींगच्या बळावर या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला चांगला गल्ला जमवत मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटांची सुरू असलेली यशस्वी घोडदौड अबाधित राखण्याच्या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रेक्षक ‘रौंदळ’वर अक्षरशः फिदा झाले आहेत.जबरदस्त अॅक्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या संगीतप्रधान संघर्षमय लव्हस्टोरीची ‘रौंदळ’चं दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केलं आहे. भाऊसाहेब शिंदेच्या दमदार एंट्रीला टाळ्या-शिट्टयांचा वर्षाव होत आहे. भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे या नव्या कोऱ्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे या कलाकारांनी ‘रौंदळ’मध्ये अभिनय केला आहे. वास्तवदर्शी वाटणारी अॅक्शन दृश्ये लक्ष वेधून घेत आहेत.

प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाच्या बळावर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या चित्रपटानं ५ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय आपल्या नावे केला आहे. एकूण ३२० सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला ‘रौंदळ’ ८९० शोजसह प्रचंड गर्दीत सुरू आहे. बॉक्स आॅफिसवरील या सकारात्मक चित्रानंतर लवकरच ‘रौंदळ’ हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं निर्मात्यांनी घोषित केलं आहे. चित्रपटाचं कथानक रसिकांना आपलंसं करत असून, कलाकारांचा अभिनय मनाला भावत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे इतर प्रेक्षकांची पावलंही ‘रौंदळ’ पाहण्यासाठी सिनेमागृहाच्या दिशेनं वळत आहेत. ‘रौंदळ’मधील गाणी खऱ्या अर्थानं मराठी संगीतरसिकांसोबतच अमराठी संगीतप्रेमींच्या मनातही रुंजी घालू लागली आहेत.

संगीतकार हर्षित अभिराज यांचे संगीत लाभलेल्या ‘मन बहरलं…’, ‘ढगानं आभाळ…’ या गाण्यासोबतच ‘भलरी…’ हे शेतीवरील गाणं महाराष्ट्रातील तमाम संगीतप्रेमींनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. बिकट परिस्थितीतही भक्कमपणे पाय रोवून उभे रहात अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देणारा हा प्रेरणादायी चित्रपट असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री आणि त्यांची लव्हस्टोरी रसिकांचं मन मोहित करत आहे.

डिओपी अनिकेत खंडागळे यांनी सिनेमॅटोग्राफी, फैझल महाडीक यांनी संकलन, महावीर साबन्नावरनं सिंक साऊंड आणि डिझाईन, मोझेस फर्नांडीस फाईट डिझाईन, गजानन सोनटक्के यांनी कला दिग्दर्शन, नेहा मिरजकर यांनी कोरिओग्राफी, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, समीर कदम यांनी मेकअप, सिद्धी योगेश गोहिल यांनी कॉस्च्युम्स डिझाईन केले आहेत. या सिनेमाचे असोसिएट दिग्दर्शक विक्रमसेन चव्हाण आहेत, तर कार्यकारी निर्माते मंगेश भिमराज जोंधळे आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button