परीक्षा खोली रामभरोसे सोडून पर्यवेक्षक मोबाईलवर व्यस्त!

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


वर्धा : (आशोक कुंभार ) जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे.

यासाठी शिक्षण तसेच शासनाच्या इतर विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले जात आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्वीच स्पष्ट केले असले तरी परीक्षा खोली रामभरोसे सोडून पर्यवेक्षक चक्क मोबाईलवर व्यस्त असल्याची धक्कादायक बाब भरारी पथकाच्या पाहणीत पुढे आली आहे.

सोमवार ६ मार्चला दहावी बोर्ड परीक्षेचा इंग्रजी या विषयाचा पेपरसाठी वर्धा जिल्ह्यात ७४ केंद्रावर ४ हजार ९२३ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी ४ हजार ८२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ९६ विद्यार्थी गैरहजर राहिले. विभागीय मंडळानी नियुक्त केलेले सहा भरारी पथके यांनी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तर उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकांनी हमदापूर येथील यशवंत हायस्कूल येथे भेट दिली. पथकातील अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांत जात पाहणी केली असता एक पर्यवेक्षक परीक्षा खोली सोडून बाहेर मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले.

भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यावर संबंधित पर्यवेक्षकाने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी पर्यवेक्षकाचा मोबाईल जप्त केला. शिवाय शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र संचालकांना संबंधितावर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले आहे. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची झडती घेतली असता एका विद्यार्थ्याजवळ कॉपी आढळल्यामुळे त्या कॉपीबहाद्दरवर कारवाई करण्यात आली आहे.

खरांगणाच्या स्वावलंबीत विद्यार्थिनी झाली बेशुद्ध
जिल्ह्यात गैर प्रकाराला आळा घळण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेशही लागू केला आहे. सोमवारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या भरारी पथकाने स्वावलंबी विद्यालय खरांगणा या परीक्षा केंद्रावर भेट दिली असता तेथील एक विद्यार्थिनी पेपर सुरु झाल्याबरोबर बेशुद्ध झाली. भरारी पथकांनी तिला तात्काळ ग्लुकोज, बिस्कीट दिले. शिवाय वैद्यकीय उपचार केले. शुद्धीवर आलेली विद्यार्थिनी पेपर सोडविण्याच्या स्थितीत नव्हती. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी बोर्डातील अधिकाऱ्यांशी संपर्क करून तात्काळ स्वतंत्रपणे लेखनिक उपलब्ध करून दिला.