वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणीवरून भावावर हत्याराने वार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे: ( आशोक कुंभार ) वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणीवरून भावावर हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
ही घटना न्यू नाना पेठेतील रोशन अपार्टमेंटमध्ये  सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

मतीन हशम सय्यद असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मतीनचा मोठा भाऊ अन्वर हशम सय्यद (वय ५५, रा. नाना पेठ, सध्या रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून जाफर हशम सय्यद (वय ४५) याच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अन्वर आणि त्यांचा भाऊ जाफर यांच्यात वडिलोपार्जित मिळकतीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. बुधवारी सायंकाळी अन्वर आणि लहान भाऊ मतीन हे दोघे त्यांच्या दुकानात काम करीत होते. त्यावेळी आरोपी जाफर हा त्याठिकाणी आला. ‘तुला खूप दिवसांपासून समजावून सांगतो, परंतु तू समजत नाहीस. माझा वडिलांच्या मिळकतीमधील हिस्सा दे’, असे म्हणत जाफर याने मतीनच्या मानेवर हत्याराने वार केले. त्यात मतीन हा गंभीर जखमी झाला. तसेच, आरोपीने फिर्यादीच्या मुलालाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.