घराचा ताबा घेण्यास गेले, महसूल कर्मचाऱ्यास लाइट घालवून मारले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


ठाणे: जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांनी दिलेल्या आदेशानुसार मीरा रोडच्या नयानगरमधील एका सदनिकेचा ताबा बँकेला देण्यास गेलेले अव्वल कारकुन यांना दोघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. संपूर्ण इमारतीतील आणि घरातील वीज घालवून मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे ते पोलिस बंदोबस्तात सदनिकेचा ताबा घेण्यासाठी गेले होते.

मीरा रोडच्या नयानगर भागातील अस्मिता सुपर मार्केटसमोर असलेल्या सलमा इमारतीत अब्दुल रहमान शेख यांची ३०३ क्रमांकाची सदनिका आहे. एका प्रकरणात ही मालमत्ता जप्त करून तिचा ताबा भारत सहकारी बँकेला देण्याचे आदेश ठाणे जिल्हादंडाधिकारी यांनी १३ फेब्रुवारीला दिले होते. त्यानुसार अपर तहसीलदार कार्यालयाचे अव्वल कारकून प्रशांत कापडे नयानगर पोलिसांनी दिलेल्या एक महिला व एक पुरुष पोलिसांचा बंदोबस्त घेऊन सदनिकेच्या ठिकाणी गेले. त्यावेळी घरात तीन पुरुष व तीन-चार महिला होत्या.

तोंडावर रुमाल बांधून आले दोघे
जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश असल्याचे सांगून घर रिकामे करण्यास वेळ दिला. मात्र, सायंकाळी ७:३० च्या सुमारास आधी सदनिकेतील व नंतर इमारतीतील वीज बंद करण्यात आली. त्यानंतर तोंडावर रुमाल बांधून आलेल्या दोघांनी कापडे यांना छातीत व कानावर मारले. यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात आले. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.