कष्टकरी बापाच्या दाराला लेकींनी बांधलं तोरण!

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील लेकींनी कष्टकरी बापाच्या दाराला आपल्या यशाचं तोरणं बांधलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेतून ‘कौलगे’ची श्रद्धा आणि ‘हिटणी’ची राजश्री दोघीही क्लास वन अधिकारी बनल्या. ‘श्रद्धा’चे वडील शंकर हे गडहिंग्लज साखर कारखान्यात तर ‘राजश्री’चे वडील मुंबईतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला आहेत. शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील दोघींनी केवळ जिद्दीच्या जोरावर उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे. श्रद्धाने राज्यात मुलींमध्ये चौथा तर राजश्रीने सातवा क्रमांक पटकावला आहे.

राजश्रीचे प्राथमिक शिक्षण हिटणीतील प्राथमिक शाळेत तर उच्च माध्यमिक शिक्षण जागृती प्रशालेत झाले. घाळी कॉलेजमधून तिने विज्ञान शाखेची पदवी घेतली. तिच्याच मार्गदर्शनामुळे भाऊ महेश याचीही नुकतीच विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाली आहे. श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कौलगेतच झाले.

सध्या दोघीही उपशिक्षणाधिकारी..!
श्रद्धा हिची रत्नागिरी येथे तर राजश्री हिची सांगली येथे उपशिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. रसायनशास्त्राच्या पदवीधर असणाऱ्या दोघीही राज्यसेवेच्या एकाच बॅचच्या असून, सध्या नागपूर येथे एकत्र प्रशिक्षण घेत आहेत.

यश अपेक्षित होतं. चांगल्या स्कोरमुळे क्लास वन पोस्ट नक्कीच मिळेल, अशी अपेक्षा होती. ते मिळाले, खूप आनंद झाला.
– श्रद्धा शंकर चव्हाण (कौलगे)

मेहनत सफल झाली. खूप आनंद झाला. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज झालं.
– राजश्री सिद्धाप्पा तेरणी (हिटणी)