गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव
गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. मराठी मंत्र साधारण 100-125 वर्षांपूर्वी गणपती हा घरामध्ये होता. कारण त्याला व्रताचे स्वरूप होते. मात्र लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा विचार समाजासमोर मांडण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. साधारण 100-125 वर्षांपूर्वी गणपती हा घरामध्ये होता. कारण त्याला व्रताचे स्वरूप होते. मात्र लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा विचार समाजासमोर मांडण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. मात्र लोकमान्यांचा हेतू आणि आजची या उत्सवाची स्थिती ही पूर्णतः भिन्न आहे. मुळात, पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत हे दीड दिवसाचे आहे. कारण या व्रतातील मूर्तीसाठी वापरली जाणारी माती दीड दिवसाहून अधिक काळ ओली राहू शकत नाही. ती कोरडी पडल्यास मूर्ती भंग पावते. मात्र माणसाने आपल्या सोयीनुसार, उत्सवप्रियतेनुसार पाच दिवस, सात दिवस, दहा दिवस उत्सव साजरे करण्याचे ठरवले. त्यातूनच मग या व्रतासाठी पार्थिवाऐवजी शाडूचा वापर होऊ लागला. पुढे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आल्या. या मूर्ती पर्यावरणासाठी नुकसानकारक आहेत. याचा शास्त्राशी संबंध नाही. शास्त्रानुसार या व्रतासाठी भरीव मूर्ती असली पाहिजे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती या पोकळ असल्याने त्या शास्त्राला अनुसरून नाहीत. सोन्या-चांदीच्या गणेशाच्या मूर्तीही या व्रतामध्ये येत नाहीत. गणेश म्हणून सुपारीचे पूजन केले जाते. तीही गोष्ट या व्रतामध्ये अमान्य आहे. आपल्या हिंदू धर्माचे सर्व उत्सव पंचांगाच्या निर्णयाप्रमाणे चालतात. आपल्याकडे चैत्री पाडव्यापासून नवे संवत्सर सुरू होते. त्या दिवशी ब्रह्मध्वज उभारून गणेशपूजन केले जाते. आपल्या वर्षभरातील सर्व सणांची सुरुवात त्या दिवसापासून होते. आपल्याकडे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ या महिन्यांमध्ये काही व्रतवैकल्ये आहेत. मात्र विशेषत्वाने जी व्रतवैकल्ये आहेत ती चातुर्मासात सांगितलेली आहेत. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मासाचा काळ असतो. आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. या एकादशीला शयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी विष्णू निद्रिस्त होतात आणि चार महिने ते निद्रिस्त असतात. या काळात व्रतवैकल्ये, उपासना केली पाहिजे अशी आपल्याकडे धर्मशास्त्रानुसार धारणा आहे. म्हणूनच या चार महिन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर व्रतवैकल्ये केली जातात. यापैकी श्रावण महिन्यातील प्रत्येक वारादिवशी एक व्रत आहे. शास्त्राप्रमाणे कोणतेही व्रत हे एक ते दीड दिवसापेक्षा मोठे सांगितलेले नाही. श्रावण मास संपल्यानंतर येणाऱया भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला केल्या जाणाऱया व्रताला पार्थिव सिद्धिविनायक व्रत असे म्हणतात. गणपती ही बुद्धिदेवता म्हणून ओळखली जाते. सरस्वती ही विद्येची देवता आहे. या विद्येला प्रोत्साहित करणारा, विद्येतील विघ्ने दूर करणारा देव म्हणजे गणपती. म्हणूनच गणपतीला विद्येचा अधिष्ठाता म्हटले आहे. कोणतीही विद्या ग्रहण करण्यापूर्वी गणपतीची उपासना करूनच त्याला सुरुवात करावी, असे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या गोष्टी करतानाही गणपतीची उपासना करावी, असे पुराणांमध्ये सांगितलेले आहे. भाद्रपद चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिकेचे व्रत असते. हे व्रत स्त्रियांनी करावयाचे आहे. त्यामध्ये शिवाची पूजा केली जाते. पार्थिव सिद्धिविनायकाच्या व्रतामध्ये पूजेसाठी, उपासनेसाठी पार्थिव म्हणजे मातीची मूर्ती असावी, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. यासाठी शेतामध्ये जाऊन माती आणावी, भिजवावी आणि सिद्धिविनायकाची मूर्ती तयार करावी. वास्तविक, निर्गुण- निराकार रूप या अर्थाने या गोळ्याला गणपतीचाच आकार असायला हवा असेही नाही. ओल्या चिकणमातीच्या गोळ्याची मंत्राने प्राणप्रतिष्ठा करावी आणि दुसऱया दिवशी त्याचे विसर्जन करावे असे अभिप्रेत आहे. यामध्ये सध्या एक चर्चा दिसून येते, ती म्हणजे पार्थिव सिद्धिविनायक बसवण्यासाठी काही मुहूर्त आहे का? वास्तविक, यासाठी कोणताही मुहूर्त नाही. चतुर्थीच्या संपूर्ण दिवसभरात केव्हाही गणपतीची प्राणप्रतिष्ठा करता येते. शास्त्रामध्ये भाद्रपदातील चतुर्थी ही मध्यान्हव्यापिनी असली पाहिजे, असे म्हटले आहे. आपल्याकडे काही वेळा तृतीयेलादेखील विनायकी चतुर्थी असते. त्या दिवशी हरितालिका व सिद्धिविनायकाचे व्रत एकत्र येते. या दिवशी सिद्धिविनायकाची षोडशोपचार पूजा करावी, उपासना करावी, आनंदोत्सव साजरा करावा असे अभिप्रेत आहे. शास्त्रामध्ये दोन प्रकारच्या पूजा सांगितलेल्या आहेत. एक स्थिर प्रतिष्ठा आणि दुसरी चल प्रतिष्ठा. आपल्या घरात असणाऱया नित्य पूजेच्या देवांची चलप्रतिष्ठा केली जाते आणि मंदिरात स्थापित केलेल्या देवांची स्थिर प्रतिष्ठा केली जाते. घरातील कोणतीही मूर्ती ही सहा इंचांहून अधिक असू नये असे शास्त्र सांगते. त्यामुळे पार्थिव सिद्धिविनायकाची मूर्तीही लहान आकाराची असावी. तिची गणपतीच्या बीजमंत्राने पूजा करावी. गणेशाला शमी, दुर्वा आणि मांदाराचे पुष्प, कण्हेरीचे, जास्वंदाचे फूल वाहावे. 21 मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. असे या पूजेचे विधिविधान सांगितलेले आहे. गणपती पूजनामध्ये पत्रीपूजा सांगितली आहे. एरवी वर्षभरामध्ये गणपतीला तुळस केव्हाही वाहिली जात नाही. फक्त गणेश चतुर्थीदिवशी पार्थिव गणेशाला बेल, तुळस, माका, पिंपळ आदी पत्रे वाहिली जातात. ही एक प्रकारची सेवा आहे, उपासना आहे. यामध्ये पैशाचा व्यवहार कोठेही नाही आणि असता कामा नये. मुळात व्रतवैकल्यांचा आणि मार्पेटचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. कारण देव हा पैशाशी संबंधित नसून तो भक्तीशी संबंधित आहे. एखाद्या वेळी तुमच्याकडे दुर्वा, फुले नसतील तरीही ‘सकल उपचारार्थे अक्षताम् समर्पयामि’ असे म्हणून अक्षता अर्पण केल्या तरीही गणपतीची पूजा पूर्ण होऊ शकते. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, या व्रतांमध्ये भक्तिभावाला आणि सेवेला अधिक महत्त्व आहे. शास्त्रामध्ये गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीचाही संबंध आढळत नाही. हरितालिका हे एक दिवसाचे व्रत आहे. गणेशचतुर्थी हे दीड दिवसाचे आहे; ऋषीपंचमी हे एकदिवसीय व्रत आहे. त्यानंतर नक्षत्रावर येणाऱया गौरींचे तिसऱया दिवशी विसर्जन होते. वामनद्वादशीला वामनाचे व्रत आहे आणि अनंतचतुर्दशीला अनंताचे व्रत सांगितलेले आहे. आपण उत्सवप्रियतेमुळे या सणाचा कालावधी वाढवला आणि कालौघात अनंतचतुर्दशीला सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा रूढ झाली. या विसर्जनासमयी ढोल-ताशे, डॉल्बी, डीजे या गोष्टीही शास्त्राने सांगितलेल्या नाहीत. शास्त्रानुसार पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे विसर्जन करताना तिचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक आहे. आज देशातील नद्यांची अवस्था आपण पाहत आहोत. बहुतांश नद्या या प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. अशा प्रदूषित पाण्यामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करणे म्हणजे एक प्रकारे गणपतीचा अपमानच आहे. त्यामुळे शुद्ध पाण्यात विसर्जन करून या व्रताचे पावित्र्य राखावे, असे आवाहन करावेसे वाटते. गणपतीच्या उपासनेसाठी विविध व्रते शास्त्रामध्ये आहेत. गोमय गणपती हेदेखील एक फलकारी व्रत आहे. कुटुंबावर जर फार मोठे अरिष्ट आल्यास आपली मानसिक स्थिती चांगली राहावी, त्या संकटाला खंबीरपणे तोंड देण्याचे बळ मिळावे यासाठी हे व्रत केले जाते. यामध्ये गाईचे ताजे गोमय आणून त्याची प्राणप्रतिष्ठा करून हरळीच्या दुर्वांनी पूजा केली जाते. हरळी ही गणपतीला विशेष प्रिय आहे. कारण हरळी हा बांबूप्रमाणे वंशवेल आहे. याखेरीज विद्यावांचित गणपतीचेही व्रत आहे. या गणपतीची मंत्रोपचाराने 21 दिवस पूजा करायची आणि नंतर तो गणपती तोंडात ठेवून बोलल्यास सिद्धी प्राप्त होते. ऋणहर गणपती व्रत आहे. यामध्ये ऋणहर गणपती स्तोत्राचा रोज 21 वेळा पाठ करून त्या गणेशाची उपासना केली जाते. या व्रतामुळे लौकिक जीवनामध्ये आपल्यावर झालेले कर्ज फिटण्यास मदत होते. अशा प्रकारे गणपतीची अनेक व्रते सांगितली आहेत. त्या-त्या तिथीला ती व्रतवैकल्ये करणे आवश्यक आहे. व्रत म्हणजे भक्तिमार्गाचाच एक प्रकार आहे. शांतता निर्माण करणे, राग-लोभ-मत्सर अशा षड्रिपूंवर विजय मिळवणे हाच कोणत्याही व्रताचा उद्देश असतो. उपासनेत जप केला जातो तो चित्त एकाग्र होण्यासाठीच. गणपती या देवतेचीही अशीच उपासना व्हायला हवी. ती ज्ञानाची देवता आहे. मन एकाग्र होण्याला आणि संकल्प करण्याला यात महत्त्व आहे. गणपती ही विद्या देणारी देवता आहे. गणपती ही सर्वांचे कल्याण करणारी, सकल जनांना आशीर्वाद देणारी देवता आहे. या दीड दिवसामध्ये गणपतीच्या बीजमंत्राचा जास्तीत जास्त जप केला तर तो आपल्या सर्वांचे कल्याण करणार आहे या भक्तिभावनेने, उपासना भावाने, श्रद्धेने या व्रताकडे पाहिले पाहिजे. |