बलात्काराचा आरोप?- चौकशी न करता फाशी!
जा देशांत हुकूमशाही आहे, एकाच व्यक्तीकडे अख्या देशाचा कारभार आहे तिथे कायमच ‘हम बोले सो कायदा’ असतो. काही देशांत नावाला ‘लोकशाही’ आहे, पण तिथला कारभारही कायम एककल्लीच असतो. त्या देशातले कायदेही इतर देशांच्या तुलनेत अतिशय कठोर मानले जातात.
अरब देशांमध्ये बऱ्याचदा अमानुष वाटतील अशा शिक्षा दिल्या जातात. भर चौकात चाबकानं फटकारून काढणं, लोकांसमोर गुन्हेगारांना फाशी देणं.. काही देशांत तर ‘खून के बदले खून’.. म्हणजे एखाद्यानं जो गुन्हा केला असेल, तीच शिक्षा त्यालाही द्यायची. म्हणजे समजा एखाद्यानं दुसऱ्याचा हात तोडला असेल किंवा त्याच्या चुकीमुळे दुसऱ्याचा हात तुटला असेल, तर हा ‘गुन्हा’ करणाऱ्याचाही हात तोडायचा, पाय तोडला असेल, तर त्याचाही पाय तोडायचा, त्यानं खून केला असेल किंवा त्याच्या कृतीमुळे एखादी व्यक्ती मरण पावली असेल, तर त्यालाही मृत्युदंड द्यायचा !
इराणमध्ये तीन गुन्हेगारांना नुकतंच फासावर चढविण्यात आलं. यावरून सध्या जगभरात चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. अर्थात त्यांचा गुन्हाही खूपच गंभीर होता. इराणमध्ये ज्या तिघांना फाशी देण्यात आली, ते तिघंही जण एक ‘ब्युटी क्लिनिक’ चालवीत होते. ‘ब्यूटी ट्रिटमेंट’च्या बहाण्यानं ते मुली आणि महिलांना आपल्या क्लिनिकमध्ये बोलवत. त्यांच्यावर इलाज करीत असल्याच्या, त्यांना आणखी सुंदर बनविण्याच्या थापा मारून या महिलांना ते ॲनास्थेशिया देऊन बेशुद्ध करायचे आणि त्या महिलांवर बलात्कार करायचे असा आरोप त्यांच्यावर होता. यात एक डॉक्टर आणि दोन ‘ब्रदर्स’चा (पुरुष नर्स) समावेश होता.
आरोपी डॉक्टर आणि त्यात तो ब्युटी ट्रिटमेंट देत असल्यानं महिलांचा त्याच्यावर आणि त्याच्या टीमवर लगेच विश्वास बसायचा. याच विश्वासाचा त्यांनी गैरफायदा घेतला. त्यांनी केलेल्या हीन कृत्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि गदारोळ उडाला. त्यानंतर दि. ३ नोव्हेंबर २०२१ रोजी या तिघांनाही अटक करण्यात आली.
हे तिघंही महिलांना बेशुद्ध करण्यासाठी लागणारी इंजेक्शन्स किंवा औषधं हॉस्पिटल अथवा मेडिकल स्टोअरमधून बऱ्याचदा लंपासही करायचे. या तिघांचाही गुन्हा अतिशय गंभीर असल्यानं आणि गुन्हेगारांना धडा बसावा, असं काही करण्याची कोणाची हिंमत होऊ नये, म्हणून त्यांना नुकतीच फाशी देण्यात आली. इराणच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेला पुष्टी दिली आहे. मात्र, यासंदर्भात दोषींना आपल्या बचावाची पूर्ण संधी दिली नाही, त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आणि अधिकाऱ्यांना हे तिघंही दोषी आहेत, असं ‘वाटलं’, म्हणून त्यांना कुठलीही चौकशी न करता थेट फासावर चढविण्यात आलं, असाही आरोप मानवी हक्क कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या बचावाची संधी मिळाली पाहिजे, त्यात कोणतीही संदिग्धता नको, त्यानंतरच त्यावर कारवाई करायला हवी, हे न्यायाचं एक मूलभूत तत्त्व आहे, पण तेच तिथे पायदळी तुडवलं गेलं, नव्हे, असे प्रकार इराणमध्ये वारंवार होतात असं मानवी हक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
याचंच दृष्य रूप म्हणजे इराणमध्ये फाशी देण्यात येणाऱ्या ‘गुन्हेगारां’ची संख्या ! कुठल्याही क्षुल्लक कारणावरून इथे लोकांना थेट फासावर चढविण्यात येतं. खरं तर आपल्या ‘विरोधकांना’ संपविण्यासाठी त्यांच्यावर कुठलेही आरोप लावले जातात, त्यांच्यावर नावाला खटले दाखल केले जातात आणि बचावाची कोणतीही संधी न देता त्यांना फाशी दिली जाते! याप्रकरणी आरोपींवर वर्षभर खटला चालला. त्यात त्यांना दोषी ठरविण्यात आलं आणि नुकतंच फासावर लटकविण्यात आलं. न्यायालयानंही आपल्या आदेशात म्हटलं, या तिघा आरोपींनी बेकायदेशीर ब्युटी क्लिनिक उघडलं. उपचारासाठी आलेल्या महिलांना बेशुद्ध करून ते त्यांच्यावर बलात्कार करायचे. एवढंच नाही त्याचे व्हिडीओ काढून या महिलांना ते ब्लॅकमेलही करायचे. हा अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि अशा गुन्हेगारांना जगण्याचा अधिकार नाही !..
जगातलं ‘फाशीचं मशीन’ !
इराणमध्ये यंदा केवळ काही महिन्यांत किती लोकांना फाशी दिली जावी? केवळ जानेवारी ते जून, या सहा महिन्यांच्या कालावधीत तिथे ३५४ ‘गुन्हेगारांना’ फाशी देण्यात आली. गेल्या वर्षी ५८२ जणांना फासावर लटकविण्यात आलं होतं. अर्थात ही ‘अधिकृत’ आकडेवारी आहे. प्रत्यक्षात किती जणांना फाशी दिली गेली हे अजून गुलदस्त्यातच आहे. त्यामुळेच इराणला ‘फाशीचं मशीन’ असंही म्हटलं जातं.