अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटेना; सहा दिवसापासून चिमुकले राहिले घरीच

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मानधनात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ९ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्याने आंदोलन अजूनही सुरुच आहे. यात अंगणवाडीतील चिमुकल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, गेली सहा दिवस चिमुकले शिक्षणाशिवाय घरीच थांबून आहेत.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी २६ जानेवारी पासून अंगणवाडी सेविका व मदतीस यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती.

मात्र या घोषणेनुसार अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

मागील सहा दिवसात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रोजच लक्षवेधी आंदोलन करुनही राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही.

त्यामुळे पुढील आठवडा भरातही संप मिटणार की, नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील पालकांकडूनही आता सरकारवर टिका करण्यात येत आहे.

मागील दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे अंगणवाडया बंद होत्या. या काळात मुलांचे नुकसान झाले. कोरोना निर्बंध कमी होउन वर्षभरात आता कुठे शैक्षणिक सत्र सुरळित होत असताना पुन्हा चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.