आंदोलन केल्यास कारवाई एसटी कामगारांना इशारा

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आत्मक्लेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तसे परिपत्रक काढून महामंडळाच्या राज्यातील सर्व विभागांना रवाना करण्यात आले
आहे.

सेवाशक्ती संघर्ष एसटी कामगार संघाने मुख्यमंत्र्यांना दि. २२ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून दि. २८ फेब्रुवारीपासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले जाणार असल्याचे कळविले आहे. शासनाने मान्य केलेल्या १६ मागण्यांची पूर्तता तातडीने करावी, अशी या संघटनेची मागणी आहे. आत्मक्लेश आंदोलनकाळात कर्मचारी अन्न, पाणी न घेता कामगिरी करतील. अंगात त्राण असेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे संघटनेने पत्रात नमूद केले आहे. या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता महामंडळाने खबरदारी घेतली आहे.

प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. सर्व कामगार आत्मक्लेश आंदोलनात सहभागी होतील. सोमवारी राज्यातील सर्व आगार पातळीवर संबंधित तहसीलदारांना निवेदन दिले जाईल.