महत्वाचेमहाराष्ट्रशेत-शिवार

महाराष्ट्रात आभाळ फाटलं! बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आष्टी यासह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस …


संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. कोकणपासून ते पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होत आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसासह काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे.

तर दुसरीकडे संभाजीनगर येथेही मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना पूर आला आहे तर थेट शेतात पाणी घुसलं आहे.

अहिल्यानगरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसासह काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती करंजी येथे ढगफुटी झाल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी पोलीस कर्मचारी महसूल प्रशासन आणि रेस्क्यू टीम गावामध्ये दाखल झाले आहेत. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालंय. नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. विशेषतः शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे जनावरं आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय.

रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून पाथर्डी तालुक्याच्या तिसगाव नदीला शंभर वर्षानंतर मोठा पूर आलाय. पावसामुळे शेवगाव पाथर्डी भागामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.

आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाचा कहर दिसून येतोय. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढलंय. आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. परिणामी परिसरातील सुलेमान देवळा, दौलावडगाव सह परिसरातील 30 गावांचा संपर्क तुटलाय.. सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतायत.. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. बीड अहिल्यानगर महामार्गावरील धानोरा इथल्या कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. दरम्यान ही परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन तहसील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलंय.

जालन्यातही मुसळधार

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात शनिवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गल्हाटी नदी आणि मांगणी नदीला मोठा पूर आलाय. या पावसामुळे शेती शिवारात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे. गल्हाटी नदीकाठच्या शहापूर दाढेगाव, करंजळा, घुंगर्डे हदगाव, गोंदी या शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील मांगनी नदीच्या पुराच्या वेढ्यात एक आदिवासी कुटुंब अडकले होते. त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी नगरपरिषद अंबडचे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं आहे.

पुण्यात पावसाचा कहर

पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील थेऊर येथे रात्रभर पडलेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरलं असून नागरिकांना रेस्क्यू करत घरातून बाहेर काढावं लागलंय. अद्यापही या परिसरात मुसळधार पाऊस बरसात असून नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू सह शेतीचे प्रचंड नुकसान झालंय, गावातील ओढ्याचं पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने 70 नागरिकांना रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप वाचवण्यात यश आलं असून या पुरामध्ये मात्र अनेक मुक्या प्राण्यांचा मृत्यू झाला, शेळ्या मेंढ्यास गाईंचाही या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button