आधी दोन्ही मुली, आणि आता तिसरी मुलगीच होण्याच्या भीतीने पतीनेच आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबला

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुलगाच हवा हा हव्यास माणसाला किती टोकाचा निर्णय घ्यायला भाग पाडतो, याचा प्रत्यय आटपाडी तालुक्यात घडलेल्या घटनेनं आली. आधी दोन्ही मुली, आणि आता तिसरी मुलगीच होण्याच्या भीतीने पतीनेच आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबला.
त्यानंतर पत्नी मयत झाल्याचे समजून तिला पतीने डोंगरामध्ये फेकून दिल्याची धक्कादायक घटना आटपाडी तालुक्यात घडली.

मात्र या भयंकर घटनेत सुदैवाने पतीकडून गळा आवळल्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली. मात्र, पतीला ती मयत झाल्याचे वाटल्याने डोंगरात फेकून दिले. प्रेमलता प्रद्युम्नकुमार जिना (वय 30) असे सदर महिलेचे नाव आहे. आटपाडीच्या काळेवाडी येथे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडित पत्नीने पतीसह दोघांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. यानुसार पती प्रद्युम्नकुमार पिताबास जेना आणि सपंतराव एकनाथ गायकवाड (रा. मानखुर्द मुंबई, मुळगांव पात्रेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांना तपाससाठी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे.
प्रेमलता यांना दोन मुली आहेत. आता ती गर्भवती होती. मात्र, तिच्या पतीला आता ही मुलगीच होणार असं वाटत होतं. त्यामुळे त्याने तपासणी करण्याचे कारण देत चार चाकी गाडीतून सोबत नेले. नेत असतानाच जीवे मारण्याच्या उद्देशाने पतीने तिचा गळा दाबून काळेवाडी गावच्या हद्दीतील चिंचघाट डोंगरात मृत झाल्याचे समजून फेकून दिले.

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीस ही महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली. सदर व्यक्तीने 112 क्रमांक डायल करून पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत महिलेला उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल सांगली येथे दाखल केले.