केळीच्या पानावर भात हातात भाकरी घेऊन मुख्यमंत्र्यांनी केले शिवार भोजन

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

हातात भाकरी, केळीच्या पानावर भात घेऊन, झाडाखाली निवांत बसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवार भोजनाचा आस्वाद घेतला.

सिद्धगिरी कणेरी मठ येथे होणार्‍या ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या तयारीची आज शिंदे यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी शेतातच झाडाखाली दुपारचे भोजन घेतले. या लोकोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री शिंदेे यांनी दिली.

आद्य काडसिद्धेश्वर महाराजांच्या प्राचीन मंदिरात महादेवाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी दौर्‍याला सुरुवात केली. लोकोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात येत असलेल्या आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते, आयुर्वेद, सोळा संस्कार यावर आधारित दालनांची त्यांनी पाहणी केली. सेंद्रिय शेतीलाही भेट दिली. त्रिमिती मॉडेल, माहितीपत्रक, ध्वनी व प्रकाश व्यवस्थेच्या माध्यमातून पंचमहाभूतांचे महत्त्व या ठिकाणी अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात येणार असून भेट देणारा प्रत्येक नागरिक पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन जाईल आणि तो समाजालाही देईल, सेंद्रिय शेतीचा अभ्यास करण्यासाठी संशोधक येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मठाच्या देशी गायींच्या गोशालेची पाहणी केली. सिद्धगिरी हॉस्पिटलची पाहणी करून देण्यात येणार्‍या वैद्यकीय सेवा सुविधांची माहिती घेतली. यानंतर गुरुकुलला भेट देत या शिक्षणपद्धतीची माहिती घेतली. येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सादर केलेल्या योग, रोप योगा, बौद्धिक प्रात्यक्षिके, वैदिक गणित आदी कलागुणांचे कौतुक करत देशाच्या उन्नतीसाठी हातभार लागेल असेच हे उपक्रम आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे 650 एकर परिसरात सुरू असलेली ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. उत्सवाला 30 ते 40 लाख लोक सहभागी होतील, या शक्यतेने शासनाच्या विविध विभागांकडून सिद्धगिरी मठाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही शिंदे यांनी सांगितले.

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘या लोकोत्सवात प्रामुख्याने पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या तत्त्वाचे मूळ स्वरूप, त्यात मानवाने केलेले अतिक्रमण व भविष्यात आपण पुनः ही तत्त्व मूळ स्वरूपात आणण्यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी जागृतीचा जागर सात दिवस केला जाणार आहे.

श्री काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, ‘या उत्सवात पारंपरिक सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे रोल मॉडेल प्रत्यक्षात पाहता येणार आहे. देशी बियाणे, जैविक खत, जैविक कीड नियंत्रक प्रक्रिया समजून घेता येणार आहेत. लाखो लोकांना जेवण, पाणी, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत विस्तृत परिसरात त्याचे नियोजन करण्यात आले आहे.’

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश अबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागार, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे, सिद्धगिरीचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील, डॉ. संदीप पाटील, शंकर पाटील, माणिक पाटील-चुयेकर, प्रताप कोंडेकर, डॉ. विवेक हळदवणेकर, गुंडूवडड्ड, यशोवर्धन बारामतीकर, डॉ. रवींद्र सिंग, मदन कुलकर्णी, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील यांच्यासह मठाचे पदाधिकारी उपस्थित होते.

घोडे, गाढवांचेही अनोखे प्रदर्शन

प्रथमच देशी प्रजातीच्या गायी, म्हशी, बकर्‍या, घोडे, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन लोकोत्सवात भरवले जाणार आहे. या उत्सवात देश भरातील परंपरिक वैद्य सहभागी होणार असून लुप्त होणारी भारतीय चिकित्सा पद्धत टिकवण्यासाठी वैद्यांचे संमेलन होणार आहे.

उत्सवात जगभरातील 50 देशांतून नामवंत संशोधक, अभ्यासक उत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह 500 विद्यापीठांचे कुलगुरू, देशभरातील हजारो संत-महंत, विविध समाजसेवी संस्था सहभागी होणार असल्याचे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले.