बीड ऊसतोड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या लेकीनं स्वप्न केलं साकार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : बीड जिल्हा तसं पाहिलं तर मागासलेला आणि ऊसतोड मजूरांचा जिल्हा. या जिल्ह्यात आज अनेक तरुण, तरुणी उच्च शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर मुंबई, पुणे येथे नोकरीला जात आहेत.

मात्र, बीड जिल्ह्यात एका शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या मुलींनं यूपीएससी परीक्षेत मोठं यश मिळवलं आहे. घरीच अभ्यास करत राज्यात पहिली तर देशात 36 व्या रँकवर येण्याचा बहुमान श्रद्धा शिंदे या तरुणीनं मिळवत आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलं आहे.
बीडमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रद्धाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घालण्याची किमया केली आहे.श्रद्धाचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी असून त्या अशिक्षित आहेत.

राज्यात मिळवला पहिला क्रमांक
श्रद्धाने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन 2018 साली अभियांत्रिकीची पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली आणि सात महिने शिकवणी केली. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये यूपीएससीची प्रिलिमनरी परीक्षाही दिली. या पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच परीक्षेत तिला यशही मिळाले.

वडिलांना झाला खूप आनंद
आपली मुलगी एक अधिकारी झाल्याची बातमी जेव्हा श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांना समजली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. लहानपणापासून श्रद्धाची जिद्द होती शिकायची, तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केले असून तिने यामध्ये मोठे यश मिळवले आहे. श्रद्धा हिला मी मुलाप्रमाणे सांभाळले आहे. मुलापेक्षा जास्त तिला मी समजत आहे. आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी दिली.

शिक्षण घेतलेल्या ठिकाणीच नोकरीची ऑफर
श्रद्धाने २०१८ साली इलेक्ट्रीकल इंजिनीअर ही पदवी हातात घेतली. तिने शिक्षण घेतल्यानंतर औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिला सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर नोकरीची ऑफर केली. मात्र, तिला भारतीय अभियांत्रिकी सेवेत जायचे होते. त्यामुळे तिने नम्रपणे नकार देत UPSC ची तयारी केली.

ऊसतोड मजुराच्या जिल्ह्यातील लेक
बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, याच बीड जिल्ह्यातील या शेतकरी कन्येने, यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केले. तिने आपल्या वडिलांसह जिल्ह्याचे नाव कोरले आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.