पाकिस्तानमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये आत्मघाती हल्ला झाला, भारतात असे कधीच होत नाही – संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पाकिस्तानातील पेशावर येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. नमाजाच्या वेळी पेशावरमधील मशिदीवर झालेला आत्मघातकी हल्ला हा सर्वात अलीकडील हल्ला आहे, ज्यात 100 हून अधिक लोक मारले गेले.

हल्ल्याच्या भीषणतेवर पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना संकटाच्या वेळी एकत्र येण्याचे अवाहन केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये आत्मघाती हल्ला झाला, भारतात असे कधीच होत नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. पाकचे संरक्षण मंत्री पुढे म्हणाले की, भारतात नमाजाच्या वेळी कधीही श्रध्दाळूंची हत्या केली जात नाही.

संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले की, ‘ देशात मशिदींमध्ये नमाजाच्या वेळीही आत्मघाती हल्ले होऊ लागले आहेत. मात्र, भारत आणि इस्रायलसारख्या देशात अशाप्रकारचे आत्मघातकी हल्ले कधी झाले नाहीत.’

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ खान पुढे म्हणाले की, केवळ एका पंथाला किंवा समाजातील एका वर्गालाच नव्हे तर संपूर्ण देशाला लक्ष्य करणाऱ्या या दहशतवाद्यांविरोधात आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी झालेल्या चर्चेत ख्वाजा आसिफ यांना दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या नव्या ऑपरेशनबद्दल विचारण्यात आले, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी नव्याने लष्करी कारवाई सुरु करण्याचा निर्णय उच्चस्तरीय अधिकारी घेतील.

ते पुढे म्हणाले की, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीचा आहे. अशा गोष्टींचा निर्णय अशा मंचावर होऊ शकत नाही.