मृतदेह फेकायला आलेलाही त्याच्यासोबत पडला दरीत

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आंबोली घाटात दरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेला वेगळेच वळण लागलं आहे. पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करताना एकाचा मृत्यू झाला.

त्याचा मृतदेह दरीत टाकण्यासाठी आपल्या मित्रासोबत आलेल्या विटाभट्टी व्यावसायिकाचाही दरीत पडून मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. हा प्रकार काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास घडला आहे. मागे एकटा राहिलेला आरोपी घाबरल्याने त्याने स्वतःच पोलिसांनी ही घटना सांगितल्याने हे सर्व प्रकरण समोर आलं आहे. काय आहे प्रकरण? भाऊसो अरूण माने (वय 30 रा.

कराड) याचा विटाचा व्यवसाय होता. त्याला कामगाराची चणचण भासत असल्याने या धंद्यासाठी कामगाराची गरज होती. यावेळी सुशांत आप्पासो खिलारे (वय 35 रा. कासेगाव पंढरपूर, (मारहाणीत हार्ट अ‍टॅकने मृत झालेला तरुण) याने आपण कामगार पुरवतो, असे सांगून एक ते तीन लाख रूपये आगाऊ घेतले.

पण ना कामगार दिले, ना पैसे परत केले. यावेळी भाऊसो माने यांनी पैशाचा तगादा लावला. पण सुशांत खिलारे यांनी पैसा देण्यास टाळाटाळ केली. अशा वेळी भाऊसो माने यांनी सुशांत खिलारे याला गाडीत घालून किणी टोल नाक्याजवळ आणून मारहाण करण्यास सुरूवात केली.

यावेळी त्याच्या सोबत आरोपी तुषार पवार (वय 30 रा.कराड) हा पण मारहाण करत होता. या मारहाणीच्या भितीने सुशांत खिलारेचा हार्ट अ‍टॅकने मृत्यू झाला.

यानंतर या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी? असा प्रश्न भाऊसो माने व तुषार पवार यांना पडला.

यानंतर ते काल रात्री आंबोलीत आले. आंबोलीत मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर हा मृतदेह फेकताना पुढे असलेल्या भाऊसो मानेचा तोल गेला आणि तो सुशांत खिलारेच्या मृतदेहासोबत दरीत पडला. यानंतर त्याच ठिकाणी आरोपी तुषार पवार हा आणलेल्या गाडीत रात्री अकरापर्यंत बसून राहिला. अखेर भीतीने त्याने घडला प्रकार पोलिसांना सांगितला हा धक्कादायक प्रकार समोर आला.