क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईसंपादकीय

राज्यभरात सकाळी ९.१५ ला होणार शासकीय ध्वजारोहण


मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२३ रोजी ध्वजारोहणाचा (Flag Hoisting) मुख्य शासकीय समारंभ राज्यभरात एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात यावा. 

या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी सकाळी ८.३० ते १०.०० च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १० वाजेनंतर करावा, असे राजशिष्टाचार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

या परिपत्रकानुसार मुंबईत शिवाजी पार्क, येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण (Flag Hoisting) होईल. विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ज्या ठिकाणी पालकमंत्री उपस्थित राहू शकणार नाहीत त्या विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. तसेच, संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयात ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. राज्यामध्ये सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर, तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत.

राष्ट्रध्वजाला वंदन करताना ‘राष्ट्रगीत’ म्हणण्यात अथवा वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅन्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजविण्यास हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या (Flag Hoisting) योग्य पद्धतीबाबत परिपत्रकानुसार सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल, याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल, याचीही दक्षता घेण्यात यावी. प्रजासत्ताकदिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोषाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडील यांना निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा ऑनलाईन पाहता यावा, यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button