ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

येत्या काळात ‘ही’ शहरं पूर्णपणे होणार जलमय?


उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये अत्यंत भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे.
येथील जमीन आणि घरांना भेगा पडल्या असून या भेगा दिवसेंदिवस मोठ्या होत आहेत. हवामान बदलामुळे येत्या काळात अनेक संकट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून वारंवार व्यक्त केली जात आहे. बदलत्या हवामानामुळे 2050 आणि 2100 पर्यंत जगभरातील अनेक शहरे पूर्णपणे पाण्याखाली जातील, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आता एका अहवालानुसार, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत जगातील काही शहरे जलमय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या आठ ते नऊ वर्षात जगातील काही शहरे अशी आहेत जी समुद्र पातळी वाढल्यामुळे आणि पुरामुळे पाण्याखाली जाऊ शकतात. ‘या’ यादीत भारतातील एका शहराचाही समावेश आहे.



क्लायमेट सेंट्रल नावाच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हवामान बदलामुळे येत्या काही वर्षांत जगातील 9 शहरे बुडू शकतात. ही कोणती शहरे आहेत ते जाणून घ्या.

आम्सटरडॅम, नेदरलँड (Amsterdam, The Netherlands)

नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅम, हूग आणि रॉटरडॅम ही शहरे उत्तर समुद्राच्या जवळ आणि कमी उंचीवर आहेत. पण ज्या वेगाने समुद्राची पातळी वाढत आहे, ते पाहता या देशातील ही सुंदर शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

बसरा, इराक (Basra, Iraq)

इराकमधील बसरा शहर शत अल-अरब नावाच्या मोठ्या नदीच्या काठावर वसले आहे, ही नदी पर्शियन गल्फला मिळते. बसरा शहराच्या आजूबाजूलाही भरपूर पाणथळ जागा आहे. अशा परिस्थितीत समुद्राची पातळी वाढल्यास या शहराला धोका निर्माण होऊ शकतो.

न्यू ऑर्लीन्स, यूएसए (New Orleans, USA)

अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्स शहरात अनेक कालवे आणि पाण्याच्या साठे आहेत. यामुळे या शहराचे पुरापासून संरक्षण होते. या शहराच्या उत्तरेला माउरेपास सरोवर आणि दक्षिणेला साल्वाडोर सरोवर आणि एक लहान सरोवर आहे. शहरातील बिलॉक्सी आणि जीन लॅफिट वाइल्डलाइफ प्रिझर्व्हज जवळपास पाण्याच्या पातळीवर आहेत, त्यामुळे पाण्याची पातळी थोडी जरी वाढली तर ही शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

व्हेनिस, इटली (Venice, Italy)

इटलीतील व्हेनिस हे शहर पाण्याच्या मधोमध वसलेले आहे. येथे भरती-ओहोटीमुळे दरवर्षी पूर येतो. व्हेनिस शहराला दोन प्रकारचा धोका आहे. पहिले म्हणजे समुद्राची वाढती पातळी आणि दुसरे म्हणजे व्हेनिस शहर बुडत आहे. व्हेनिस शहर दरवर्षी 2 मिमी बुडत आहे. समुद्राची पातळी झपाट्याने वाढली तर 2030 पर्यंत हे शहर पाण्यात बुडणार आहे.

हो ची मिन्ह, व्हिएतनाम (Ho Chi Minh City, Vietnam)

व्हिएतनाम येथील हो ची मिन्ह हे शहर थु थीम नावाच्या दलदलीच्या ठिकाणी वसलेले आहे. हे समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे. मेकाँग डेल्टा नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे 2030 पर्यंत हो ची मिन्ह शहर पाण्याखाली जाईल अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोलकाता, भारत (Kolkata, India)

पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्याच्या आसपासची जमीन अतिशय सुपीक मानली जाते. पण क्लायमेट सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, समुद्राच्या पातळीत झालेली वाढ या शहराचे अस्तित्वच संपुष्टात आणू शकते. हो ची मिन्ह सिटीप्रमाणेच कोलकात्यालाही मान्सूनचा पाऊस आणि भरती-ओहोटीची समस्या भेडसावत आहे. पावसाळ्यात येथे पूर येतो. येथे पावसाचे पाणी जमिनीत जात नाही त्यामुळे येत्या काळात हे संपूर्ण शहर पाण्याखाली जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बँकॉक, थायलंड (Bangkok, Thailand)

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडची राजधानी बँकॉकला ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वाधिक फटका बसला आहे. बँकॉक शहर समुद्रसपाटीपासून फक्त 1.5 मीटर उंचीवर आहे. बँकॉक शहर वालुकामय मातीवर वसलेले आहे आणि दरवर्षी 2 ते 3 सेंटीमीटरने बुडत आहे. रिपोर्टनुसार, 2030 सालापर्यंत, बँकॉकचे किनारपट्टीचे भाग था खाम, समुत प्राकन तसेच सुवर्णभूमी ही शहरे आणि या शहराचे आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

जॉर्जटाउन, गयाना (Georgetown, Guyana)

गिनी या पश्चिम आफ्रिकन देशाची राजधानी जॉर्जटाउनच्या एका बाजूला सुमारे 400 किमी लांबीचा समुद्र आहे. येथील जोरदार लाटांचा शहराला तडाखा बसतो, या लाटा शहराच्या आतपर्यंत पोहोचतात. पाण्याच्या पातळीपासून या शहराच्या किनाऱ्याची उंची फक्त 0.5 मीटर ते एक मीटर पर्यंत आहे. अशा स्थितीत पाण्याची पातळी वाढल्यास हे शहरही पाण्यात बुडण्याची शक्यता आहे.

सवाना, अमेरिका (Savannah, USA)

अमेरिकेतील जॉर्जिया येथे असलेले सवाना शहर चारही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. आजूबाजूला भरपूर पाणथळ जागा आहे. 2030 पर्यंत जॉर्जिया शहरात मोठी आपत्ती येऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 2050 पर्यंत हे शहर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button